जेवण न दिल्याच्या कारणावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशमधील बरेली येथे ही घटना घडली आहे. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणारा उत्तर प्रदेशमधील भाजपा मंत्र्याचा पुतण्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी प्रेमनगर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक नरेश कश्यप आणि सुशांत कश्यप यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भाजपा मंत्र्याचा पुतण्या अमित कुमार सक्सेनासह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कुमार सक्सेना मंगळवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आला होता. मात्र, तेव्हा कर्मचाऱ्यांनी जेवण नसल्याचे त्यांना सांगितले. यावरून सक्सेनाने कर्मचाऱ्यांना शिव्यागाळ करत निघून गेला. काही वेळानंतर सक्सेनाने परत येत बाहेर जेवायला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी पळून जात आपला जीव वाचवला.
हेही वाचा – पाकिस्तानकडून काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताच भारताने फटकारले; म्हटलं, सतत खोटे…
याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सक्सेना आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तेथून पळ काढला होता. याप्रकरणी हॉटेल मालक कश्यप यांनी गुन्हा दाखल केला आहे. कश्यप यांनी सांगितले की, अमित सक्सेना हा भाजपा मंत्र्याचा पुतण्या आहे. घटनेनंतर कश्यप यांनी संबंधित मंत्र्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री झोपले असल्याचं कारण सांगण्यात आलं. एनडीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.