राज्य सरकारवर टीका केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पत्रकारांना दिल्याने उत्तर प्रदेशचे मंत्री विजय बहादूर पाल पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. कन्नौज येथे एका सायकल मेळाव्याच्या समारोपप्रसंगी राज्याचे माध्यमिक शिक्षणमंत्री पाल यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही धमकी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल या कन्नौज मतदारसंघातील खासदार आहेत.
पत्रकारितेच्या तलवारीने आपण दहशत बसवू शकतो असे पत्रकारांना वाटते, मात्र त्यांना माहिती नाही की आम्ही समाजवादी आहोत, आम्हाला राग आला तर हल्ला चढवू, पात्रता लक्षात येईल, असे पाल म्हणाले. उत्तर प्रदेशातील पोलीस दरोडेखोरांच्या संघटित टोळीसारखे काम करीत असल्याचे वक्तव्य करून पाल यांनी गेल्या वर्षी वाद निर्माण केला होता. उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री राममूर्ती वर्मा यांच्यावर शहाजहानपूरमधील पत्रकार जगेंद्रसिंह यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला असतानाच पाल यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

Story img Loader