‘‘केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश सरकारला कोटय़वधींचा निधी दिला जातो. मात्र उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सरकार या निधीचा वापर जनतेच्या हितासाठी न करता त्याचा गैरव्यवहार करत आहेत,’’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अखिलेश यादव यांच्या सरकारवर केली. विकासाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बुंदेलखंड प्रांतातील रथ येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी यांनी समाजवादी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या २५ वर्षांत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे सरकार येथे सत्तेत आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी राज्याच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले, असे सांगून राहुल म्हणाले, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये नेहमीच विकास झालेला आहे.
‘‘तुमची स्वप्ने खूपच छोटी आहेत. तुम्ही सरकारकडून फारच थोडे मागता. औद्योगिकीकरण आणि रोजगार याच तुमच्या मागण्या आहेत. मात्र तुमच्यात काहीही कमी नाही. तुम्ही ठरवले तर तुमचा विकास होऊ शकतो. उद्योजकांना सांगा, नेहमी बंगळुरू किंवा दिल्लीमध्ये का जाता, बुंदेलखंडमध्येही या. तुमची स्वप्ने, ध्येयधोरणे वाढवा. काँग्रेसला साथ दिली तर तुमच्यात नक्कीच बदल घडेल,’’ असे आश्वासन राहुल यांनी दिले.
‘‘बुंदेलखंडमधील दुर्गम भागाचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने ३००० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. पण त्याचा फायदा येथील जनतेपर्यंत पोहोचलाच नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, केरळ, महाराष्ट्र या राज्यांमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली. उत्तर प्रदेशात सत्ता असती तर आम्ही या प्रदेशाचाही विकास केला असता,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh misusing central funds rahul
Show comments