उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथं भारतीय जनता पक्षाचा समर्थक बाबर अलीच्या हत्येची घटना अद्याप ताजी असताना कानपूरमधूनही असंच एक प्रकरण समोर येत आहे. कानपूरमध्ये एका सुशिक्षित मुस्ली युवकाने भाजपाचा झेंडा लावला म्हणून त्याला डोळे फोडून मुंडकं छाटण्याची धमकी त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे. एवढंच नव्हे तर त्याला अनेकदा मारहाणही करण्यात आली आहे.

आपला जीव धोक्यात घालून त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. . कानपूरमधल्या किदवई नगर भागात राहणारा शकील अहमद एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. काही वर्षे काम केल्यानंतर त्याने ती नोकरी सोडली आणि घरी येऊन ज्वेलरीचा व्यवसाय करू लागले. शकील सांगतो की, तो २०१३ पासून भाजपा समर्थक आहे, तो नरेंद्र मोदींचा चाहता आहे. तो म्हणाला की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मी माझ्या घरावर भाजपाचा झेंडा लावला होता. पण माझ्या आजूबाजूच्या सर्वांनी मात्र आपापल्या घरावर काँग्रेसचे झेंडे लावले होते.

शकीलने सांगितलं की याच कारणामुळे त्याचे शेजारी त्याच्यावर नाराज होते आणि सगळ्यांनी मिळून त्याच्या घरावरचा भाजपाचा झेंडा काढून फेकून दिला. पण त्याने पुन्हा एकदा झेंडा लावला. या गोष्टीमुळे नाराज होऊन त्याचा शेजारी शाहनवाजने त्याला मारण्याची धमकी दिली. तसंच परिसरातल्या सगळ्या मुस्लिमांसोबत राहिला नाहीस तर तुझे डोळे फोडून मुंडकं छाटलं जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर काही जणांनी त्याला मारहाणही केली.

शकील म्हणाला की मला आता माझ्या जीवाला धोका आहे असं वाटू लागलं आहे, म्हणून मी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी शकीलच्या तक्रारीनंतर शाहनवाज, राशिद, रिजवान आणि भल्लू यांच्याविरोधात एफआयआर लिहून घेतला आहे.

Story img Loader