पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ‘खेलो होबे’ची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळाला होता. मात्र तृणमूल काँग्रेसने भाजपाला चितपट करत विधानसभेत बहुमत मिळवलं. आता तोच कित्ता समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात गिरवण्याचं मानस केला आहे. ‘खेलो होबे’च्या घोषणेवरून उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी ‘खेला होई’ या घोषणेची फलकबाजी करण्यात आली आहे. २०२० विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ही घोषणा दिली आहे. ‘खेला होबे’चं हे ‘खेला होई’ हे भोजपुरी वर्जन आहे.
कानपूरमध्य़े समाजवादी पार्टीने ठिकठिकणी ‘अब युपी में खेला होई’ अशा घोषणा असणारे फलक लावले आहेत. या फलकावर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचं सायकल चिन्हं आणि स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. या घोषणेद्वारे समाजवादी पार्टीने योगी सरकारविरुद्ध शंखनाद केला आहे. समाजवादी पार्टीचे कानपूर शहरप्रमुख डॉ. इम्रान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
बाबा का ढाबा: यूट्युबर्समुळेच मला प्रचंड मानसिक त्रास; कांता प्रसाद यांचा आरोप
“आम्ही हे फलक संपूर्ण कानपूरमध्ये लावले आहेत. कारण पश्चिम बंगालच्या जनतेने जो धडा भाजपाला शिकवला. तो धडा उत्तर प्रदेश २०२२ निवडणुकीत जनता भाजपाला शिकवेल”, असं समाजवादी पार्टीचे नेते डॉ. इम्रान यांनी सांगितलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाने अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.