Anuj Chaudhary On Holi : रमजान, ईद आणि होळी अशा आदी सणांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून नागरिकांना कडक सूचना दिल्या जातात. याच प्रकारे उत्तर प्रदेशातील संभलमध्येही पोलिसांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीओ अनुज चौधरी यांनी कडक शब्दांत सूचना दिल्या. मात्र, यावेळी अनुज चौधरी यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.
“होळीच्या दिवशी रंगांवर आक्षेप असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये, जुम्मा वर्षातून ५२ वेळा येतो, तर होळी वर्षातून एकदाच येते”, असं विधान अनुज चौधरी यांनी केलं आहे. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोक सहभागी झाले होते. यावेळी अनुज चौधरी यांनी कडक शब्दांत सूचना देत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. ‘तुम्ही तुमच्या धर्माचा आदर करत असाल तर इतर धर्माच्या लोकांच्या धर्माचाही आदर करा’, असंही अनुज चौधरी यांनी म्हटलं. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
सीओ अनुज चौधरी नेमकं काय म्हणाले?
“जुम्मा वर्षातून ५२ वेळा येतो, होळी वर्षातून एकदाच येते. जर मुस्लिम समाजातील लोकांना असं वाटत असेल की होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका. होळीच्या दिवशी कोणी गैरकृत्य करताना आढळल्यास त्याला बक्षीस दिले जाणार नाही. आम्ही संभलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही. होळीच्या दिवशी जर लोक घराबाहेर पडत असतील तर त्यांचं मन एवढं मोठं असावं की सर्व सारखेच असावेत. ज्याप्रमाणे मुस्लिम समाज वर्षभर ईदची वाट पाहतो, त्याप्रमाणे हिंदू समाजही होळीची वाट पाहतो. रंग घालून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते आणि ईदच्या वेळी लोक शेवया बनवतात आणि एकमेकांच्या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर करा”, असं अनुज चौधरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनुज चौधरी हे त्यांच्या वक्तव्यामुळे आणि कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही अनुज चौधरी हे त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. अनुज चौधरी हे त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत आले होते. मात्र, आता अनुज चौधरी हे त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.