Uttarakhand : उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरजवळील एका गावात १० फेब्रुवारी रोजी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, अपहरण झाल्याच्या घटनेनंतर दोन समुदायांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण दुसऱ्या समुदायातील व्यक्तीने तरुणाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोन समुदाय आमने-सामने आले आणि जातीय तणाव निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेत १०० अज्ञात लोकांच्या एका गटाने तोडफोड आणि दगडफेक केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास १०० अज्ञात लोकांच्या जमावाने दुसऱ्या समुदायातील एका व्यक्ताने मुलीचे अपहरण केल्याच्या संशयावरून त्या व्यक्तीच्या घरात घुसून तोडफोड केली आणि दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. मात्र, तरीही काही लोकांनी दगडफेक सुरूच ठेवली होती, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, जमावाला शांत करण्याचा आणि घरी परतण्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार देण्यात येत होत्या. मात्र, तरीही जमाव अधिक आक्रमक होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने पोलिसांनी अधिक पुरेसे बळ मागवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. भारतीय दंड संहितेच्या कलम १९०, १९१(२), १९१(३) आणि २२१ अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक शेखर चंद सुयाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, एका संघटनेच्या काही सदस्यांनी इतर समुदायावर दगडफेक केल्यावर दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही. परंतु आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि घटनास्थळी साक्षीदारांकडून पुरावे गोळा करत आहोत. हरिद्वार पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, धार्मिक द्वेष भडकावणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

सध्या सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात पोलीस आणि पीएसी तैनात करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे काम देखील सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि जवळपासच्या गावांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर शोध आणि तपासणी करण्यात येत आहे. तांत्रिक पथकांच्या मदतीने सर्व संभाव्य ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand abduction of 15 year old girl high tension in a village in haridwar district police force deployed gkt