जगभरातील हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या येथील ज्योतिर्लिग श्री केदारनाथ मंदिराची डागडुजी करण्यासाठी राज्य सरकारने एक योजना आखली असून मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी त्याची घोषणा केली. केदारनाथ मंदिराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रावत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
रावत म्हणाले की, डागडुजीची ही योजना दोन टप्प्यांतील आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे या मंदिराची खूपच हानी झाली असून यंदा किंवा यापुढे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. यासाठी या मंदिराच्या चारही बाजूंना मोठी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.
हे काम येत्या चार-पाच दिवसांत सुरू होईल. याशिवाय येथून वाहणाऱ्या मंदाकिनी आणि सरस्वती या नद्यांची पात्रेही वळविण्यात येणार आहेत. केदारनाथपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या लिंचौली येथे एक नवी वसाहत निर्माण करणे, हाही या योजनेचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या चारधाम यात्रेतील सर्व ठिकाणे उत्तराखंडमध्येच असल्याने या यात्रेत काही चांगला बदल करता येईल का, याची चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ही यात्रा वर्षांतील विशिष्ट काळातच सुरू असते, यात बदल करून ती वर्षभर सुरू ठेवता येईल का, याचाही आम्ही विचार करत आहोत. या यात्रेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळत असल्याने हा पर्याय आमच्या विचाराधीन आहे.त्याबाबत संबंधितांशी विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे रावत यांनी सांगितले.
केदारनाथ मंदिराची डागडुजी होणार
जगभरातील हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या येथील ज्योतिर्लिग श्री केदारनाथ मंदिराची डागडुजी करण्यासाठी राज्य सरकारने एक योजना आखली असून मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी त्याची घोषणा केली.
First published on: 01-06-2014 at 02:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand announces massive kedarnath reconstruction