उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदत व बचावकार्यास जबरदस्त तडाखा बसला असून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. या परिस्थितीत चिखलमाती हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. याखेरीज २००हून अधिक पीडित गावांमधील बेघर झालेल्या लोकांना अन्नधान्याच्या मोठय़ा टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मदतकार्यासाठी २००हून अधिक जणांचा समावेश असलेले तज्ज्ञांचे एक पथक चिखलमाती तसेच अन्य ढिगारे उपसण्याच्या कामी लागले असून मृतदेहांचाही त्यांनी शोध घेतला आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून केवळ ५९ मृतदेहांवरच मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. याखेरीज, गौरीमुख आणि जंगलचाट्टी येथे २३ मृतदेहांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्यंतरीच्या खराब हवामानामुळे या कामात मोठा खंड पडला होता, असे पोलीस उपमहासंचालकअमित सिन्हा यांनी सांगितले. केदारघाटी येथे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू झाल्यामुळे बचावकार्यार्थ फारसे काही करता आले नाही.
यामुळे २४० गावांमधील लोकांना रसद पुरविण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. रुद्रप्रज्ञा, उत्तरकाशी, चामोली आणि पिठोरगड जिल्ह्य़ांमधील मुख्य रस्ते अजूनही मोठय़ा प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्यामुळेही मदतकार्यात अडथळे येत आहेत.

Story img Loader