उत्तराखंडमध्ये खाण माफियाचा पाठलाग करताना पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. पोलीस आणि माफियांमध्ये झालेल्या गोळीबारात या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या भाजपा नेते गुरताज भुल्लर यांच्या पत्नी गुरप्रीत कौर होत्या. गुरताज भुल्लर हे ब्लॉक अध्यक्ष आहेत. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून वाद पेटला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून, दोन पोलीस कर्मचारी बेपत्ता आहेत.
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद पोलिसांचं एक पथक खाण माफिया जफरला अटक करण्यासाठी उत्तराखंडमधील जासपूर येथे पोहोचलं होतं. यावेळी पाळलाग करताना दोन पोलिसांना गोळ्या लागल्या तर इतर तीन कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, जाफरवर ५० हजारांचं बक्षीस होतं आणि तो भुल्लर यांच्या घरात लपल्याचा संशय होता.
भाजपा नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं. उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आरोपी एक फऱार गुन्हेगार असून त्याच्यावर ५० हजारांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. जेव्हा आमचं पथक पोहोचलं तेव्हा त्यांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांच्याकडून शस्त्रंही काढून घेण्यात आली होती,” अशी माहिती मोराबादमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, दोनजण अद्यापही बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.