उत्तराखंडमधील वादात काँग्रेसची कारवाई; आरोप-प्रत्यारोप
उत्तराखंडमध्ये राजकीय पेच गंभीर बनला असून, त्यात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा व पक्षाचे सहसचिव अनिल गुप्ता यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. साकेत हे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सरकारविरोधात बंडाळी करणाऱ्या आमदारांपैकी एक आहेत. प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी सांगितले, की शिस्तभंग समितीने साकेत व गुप्ता यांना पक्षातून काढण्याची शिफारस केली होती. वृत्तपत्रात तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर या दोघा नेत्यांनी केलेली काँग्रेसविरोधी वक्तव्ये प्रसारित झाली होती. साकेत हे टिहरी येथून दोन वेळा लोकसभा उमेदवार होते. प्रदेश काँग्रेसने शिस्तभंग समितीच्या शिफारशी मान्य करून साकेत व गुप्ता यांच्यावर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी सांगितले, की आमच्या पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही व कठोर कारवाई केली जाईल.
उत्तराखंडचे सभापती गोविंद कुंजवाल यांनी सांगितले, की सात बंडखोर काँग्रेस आमदारांना नोटिसा दिल्या असून, अपात्र का ठरवू नये, अशी विचारणा केली आहे. मुख्य प्रतोद इंदिरा हृदयेश यांनी अर्थ विधेयकाच्या वेळी पक्षादेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. प्रदेश भाजप अध्यक्ष व विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांनी सांगितले, की आम्ही सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे. त्यामुळे सभापतींनीच पद सोडणे चांगले राहील. उत्तराखंडमध्ये ७० सदस्यांपैकी काँग्रेसचे ३५ आमदार आहेत व प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सहा आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, तर भाजपचे २८ आमदार आहेत. भाजपने पैशाच्या जोरावर सरकारे पाडण्याचे उद्योग करू नयेत, अशी टीका या सगळय़ा गदारोळात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.