उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील सुखीधांग इंटर कॉलेजमध्ये जेवण बनवण्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी दलित प्रवर्गातील महिलेने बनवलेले जेवण जेवण्यास उच्च जातीमधील मुलांनी नकार दिला होता. आता या वादात नवे वळण लागले आहे. आता दलित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च जातीमधील महिलेने तयार केलेल्या जेवणावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, उच्च जातीतील विद्यार्थ्यांनी दलित प्रवर्गातील महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तुम्ही जर दलित प्रवर्गातील महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार देत असाल तर आम्हीसुद्धा उच्चवर्णीय महिलेच्या हाताने बनवलेले अन्न खाणार नाहीत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. प्राचार्य प्रेम सिंह यांनी शिक्षणाधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील एकूण ५८ मुले शासकीय आंतर महाविद्यालय सुखीधांग येथे पोहोचली. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने सर्व मुलांना एमडीएममध्ये जेवणासाठी बोलावले असता, दलित विद्यार्थ्यांनी सवर्ण महिलेने तयार केलेले जेवण स्वीकारण्यास नकार दिला.
शिक्षकांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहून जेवणावर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार दलित प्रवर्गातील सर्व मुलांनी उच्च जातीतील महिलेने हाताने बनवलेले अन्न खाण्यास विरोध केला आहे. त्यांनी घरून डबा आणणार असल्याचे सांगितले. दलित प्रवर्गातील २३ मुलांनी शुक्रवारी शाळेत जेवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी, सीईओ आर सी पुरोहित यांनी तपासादरम्यान जेवण बनवणाऱ्या दलित महिला सुनीता देवी यांना काढून टाकले होते आणि पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती स्थगित केली होती. त्यानंतर आता दलित प्रवर्गातील मुलांनी जेवणावर बहिष्कार घातल्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. एका सरकारी माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजन देणाऱ्या दलित समाजाच्या महिलेने उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसाठी शिजवलेले जेवण खाण्यास नकार दिल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.
डिसेंबरच्या सुरुवातीला भोजनमाता म्हणून तिची नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, विद्यार्थ्यांनी महिलेने बनवलेले जेवण तिच्या जातीमुळे खाणे बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घरातून डब्यातून जेवण आणण्यास सुरुवात केली. शाळेतील ६६ पैकी ४० विद्यार्थ्यांनी दलित समाजातील महिलेने बनवलेले जेवण खाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दलित समाजातील महिलेला भोजनमाता म्हणून नियुक्त करण्यावरही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतला होता. चंपावतचे मुख्य शिक्षण अधिकारी आर.सी. पुरोहित म्हणाले की, नियुक्ती करताना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याने महिलेची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
प्रधान दीपक राम यांनी लेटर पॅडवर एक निवेदन जारी केले आहे की, गावात काही लोकांकडून विनाकारण जातीवाद आणि अराजकता पसरवली जात आहे. भोजनमातेच्या नियुक्तीला विरोध न केल्याने पाच प्रभाग सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिल्याचे सांगितले. सदस्यांनी गुरुवारी टनकपूर गाठून एसडीएमकडे सामूहिक राजीनामे सादर केले. राजीनामे दिलेल्या सर्वच वॉर्ड सदस्यांवर गावात अराजकता निर्माण करून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. आपल्या कार्यकाळात झालेल्या सर्व विकासकामांचा तपशील देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.