उत्तराखंडातील जलप्रपातात झालेल्या जीवितहानीच्या नेमक्या संख्येविषयी तेथील सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीत किमान दहा हजारजण दगावले असल्याची शक्यता आता उत्तराखंड विधानसभेचे सभापती गोविंदसिंह कुंजवाल यांनी व्यक्त केली आहे. तर सरकारी आकडा ८२२ आहे. दरम्यान, दोन आठवडय़ांनंतरही उत्तराखंडातील आपद्ग्रस्त भागातील बचावकार्य सुरूच आहे.
केदारनाथ, बद्रीनाथ, रुद्रप्रयाग, चमोली आदी परिसराला दोन आठवडय़ांपूर्वी प्रचंड पावसाचा तडाखा बसला. या तडाख्यात या परिसरातील किमान ६०० गावे सापडली. प्रमुख नद्यांना आलेल्या महापुरामुळे किनाऱ्यावरील गावेच्या गावेच वाहून गेली. तसेच केदारनाथाच्या यात्रेला आलेल्या यात्रेकरूंनाही या महापुराचा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत नेमकी किती जीवितहानी झाली यावरून उत्तराखंड सरकारमधील नेत्यांमध्येच एकमत झालेले नाही. सरकारी आकडा ८२२ असताना गेल्याच आठवडय़ात तेथील पर्यटनमंत्र्यांनी हा आकडा पाच हजाराच्या पुढे असल्याची भीती व्यक्त केली होती. आता कुंजवाल यांनी शनिवारी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून आल्यानंतर अलमोरा येथे बोलताना मृतांचा आकडा दहा हजाराच्याही वर असण्याची शक्यता व्यक्त केली.

Story img Loader