गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण जलप्रपातातील मृतांचा आकडा ५ हजार होण्याची भीती शासकीय यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आह़े  या प्रपाताच्या केंद्रस्थानी असलेल्या केदारनाथ खोऱ्यात अडकलेल्या सर्व यात्रेकरूंची सुटका करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आह़े  तरीही इतर ठिकाणी अडकलेल्या सुमारे १९ हजार यात्रेकरूंच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत़.
येथे सुमारे २२ हजार यात्रेकरू अडकले होत़े  त्यापैकी केदारनाथ येथील सुमारे ३ हजार यात्रेकरूंची सुटका करण्यात आतापर्यंत बचाव यंत्रणांना यश आले होत़े  उर्वरित १९ हजारांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत़  तरीही आपत्तीची तीव्रता पाहाता त्यापैकी किमान ५ हजार लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता असल्याचे उत्तराखंड शासनाचे म्हणणे आह़े  आपत्तीग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर उत्तराखंडचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री यशपाल आर्या यांनी जॉलीग्राण्ट विमानतळावर पत्रकारांना ही माहिती दिली़
बचावकार्य युद्धपातळीवर
खराब हवामानामुळे रविवारी पहाटे काही काळासाठी थांबविण्यात आलेले उत्तराखंडमधील बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आह़े  हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून या भागात पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्यामुळे उंच ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा पुन्हा एकदा युद्धपातळीवर कामाला लागली आह़े
४० हून अधिक हेलिकॉप्टर्स आणि १० हजारांहून अधिक लष्करी आणि निमलष्करी दलाचे जवान बचावकार्यात सहभागी झाले आहेत़  बद्रिनाथजवळच्या ५० कि.मी.च्या परिसरात पायवाटा तयार करण्यात आल्या असून या वाटांनी अडकलेल्यांना सोडविण्याचे कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती भारत- तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाचे वरिष्ठ अधिकारी अमित प्रसाद यांनी गौचर येथे पत्रकारांना सांगितल़े  खराब हवामानामुळे हवाई मार्गाने सुरू असलेल्या बचावकार्यात व्यत्यय आल्यास पर्याय म्हणून हे मार्ग तयार करण्यात येत असून त्यासाठी आयटीबीपीचे सुमारे २०० जवान कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितल़े
शनिवारी केदारनाथ येथून १२३ मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याने मृतांचा अधिकृत आकडा ६७३ झाला आह़े  उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आह़े  केदारनाथ मंदिराच्या पुनरुद्धाराला शासन प्राधान्य देईल़  भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचना विचारात घेऊनच हे कार्य करण्यात येईल, असे बहुगुणा यांनी सांगितल़े
राज्याच्या विविध भागांत सापडलेल्या मृतदेहांवर धार्मिक प्रथांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील़  असे त्यांनी सांगितल़े  
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बाधित क्षेत्राचा हवाई दौरा केल्यानंतर बहुगुणा यांची भेट घेतली़  या वेळी मोदी यांनी केदारनाथ मंदिराच्या पुनर्बाधणीसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिल़े

Story img Loader