उत्तराखंड राज्यातील जलप्रलयास ११ दिवस उलटून गेले असून भारतीय हवाई दल, आयटीबीपी, भारतीय लष्कर आणि एनडीएमए यांच्या संयुक्त बचावकार्यात आजवर एक लाख लोकांना वाचविण्यात यश आले आहे. एकीकडे उत्तराखंड राज्यात साथीच्या रोगांना सुरुवात झाली असून अजूनही साडेतीन हजार लोक अडकून पडले असल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली.
मुसळधार पाऊस आणि धुके यामुळे खराब झालेले हवामान यामुळे मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यास उशीर होत होता. मात्र बुधवारी केदारनाथ परिसरात मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली. नेमक्या किती मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले तो आकडा मात्र समजू शकला नाही.
मुख्य अडथळे आणि आव्हाने
एकीकडे बचावकार्य सुरू असताना हे कार्य करणाऱ्या पथकांना कोसळलेल्या इमारतींच्या – रस्त्यांच्या ढिगाऱ्यांचा, साथीच्या रोगांचा आणि मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. तसेच जेसीबीसारखे साधन उंचीवर कसे नेता येईल याबाबतही बराच खल सुरू आहे.
उत्तराखंड राज्याचे पोलीस महासंचालक सत्यव्रत बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही ३५० जणांचा नेमका ठावठिकाणा कळू शकलेला नाही. तर भारतीय लष्कराने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार सुमारे एक लाख लोकांना वाचविण्यात आजवर यश आले असून अद्याप साडेतीन हजार लोकांना वाचविण्याचे आव्हान बचावपथकांसमोर आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पत्नी केदारनाथमधून बेपत्ता
उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात बंकुरा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गेल्या नऊ दिवसांपासून केदारनाथमधून बेपत्ता झाले आहेत. ब्रिजवासी बिश्वास आणि त्यांच्या पत्नी मनिका बेपत्ता झाल्याचे काँग्रेस पक्षकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
बिश्वास यांच्यासमवेत असलेले त्यांचे भाचे अनिरुद्ध सरकार आणि त्यांच्या पत्नी नीलिमा हे बंकुरा येथून परतले आहेत. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी अद्यापही बेपत्ता आहेत.
.. तर मंगळवापर्यंत बचावकार्य पूर्ण
गौरीकुंडजवळ हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर मंगळवारी कोसळले होते. त्यामधील ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ आणि ‘डाटा रेकॉर्डर’ सापडले असून, हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण दगावल्याचे हवाई दलप्रमुख बाऊनी यांनी सांगितले. शुक्रवारपासून हवामान चांगले राहिल्यास मंगळवापर्यंत हवाई दल बचावकार्य पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेलिकॉप्टरमधील रेकॉर्डर मिळाल्याने दुर्घटना कशामुळे घडली हे समजेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले की काही तांत्रिक अडचण आली, यासंदर्भात आताच त्याबाबत मत मांडणे चुकीचे आहे. दुर्घटनेत दगावलेल्या २० जणांपैकी हवाई दलाचे पाच, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीसचे सहा, तर राष्ट्रीय आपत्ती निवारण कृती दलाच्या ९ जवानांचा समावेश आहे. हवामान खराब असतानाही जोखीम घेण्यात आली होती काय, असे विचारता खराब हवामानात अशा धोक्यांचा विचार नेहमी होतो असे त्यांनी सांगितले. हवाई दलाचे वैमानिक अत्यंत प्रशिक्षित असून अशा मोहिमेवर जाण्यात सक्षम आहेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील आणखी चार जणांचे मृतदेह सापडले.
या दुर्घटनेत शहीद झालेल्या उत्तर प्रदेशच्या दोघा जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये मदत अखिलेश यादव यांनी जाहीर केली. सुधाकर आणि अखिलेश प्रताप हे उत्तर प्रदेशचे दोन जवान या घटनेत मृत्युमुखी पडले. दरम्यान, या महाप्रलयात बंकुरा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गेल्या नऊ दिवसांपासून केदारनाथमधून बेपत्ता झाले आहेत. ब्रिजवासी बिश्वास आणि त्यांच्या पत्नी मनिका बेपत्ता झाल्याचे काँग्रेस आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. बिश्वास यांच्यासमवेत असलेले त्यांचे भाचे अनिरुद्ध सरकार आणि त्यांच्या पत्नी नीलिमा हे बंकुरा येथून परतले आहेत.