उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्तीस सोमवारी एक महिन्याचा अवधी पूर्ण झाला असून अद्याप ५,७४८ लोक बेपत्ता आहेत. मात्र त्यांना अजूनही मृत म्हणून घोषित करण्यात येणार नाही, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सोमवारी येथे सांगितले. गेल्या १५ जून रोजी राज्यातील मुसळधार पावसामुळे आलेले महापूर आणि अनेक ठिकाणी कडे कोसळल्यामुळे ठार झालेल्या व्यक्तींच्या निकटवर्तीयांना पाच लाख रुपये मदत म्हणून देण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात येईल आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरूच ठेवण्यात येईल, अशी माहिती बहुगुणा यांनी दिली. अर्थात, बेपत्ता असलेल्या व्यक्ती सापडल्या तर मदतीपोटी मिळालेली रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना परत करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय नियोजन आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला हेही या वेळी उपस्थित होते.
बेपत्ता व्यक्तींना मृत म्हणून घोषित करणार काय, असे विचारले असता ही बाब आशेविरोधात आहे. परंतु आम्ही त्यांना मृत म्हणून घोषित करू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बेपत्ता व्यक्तींसंबंधी अन्य राज्यांनी दिलेली यादी आणि आमच्याकडे असलेल्या यादीवरून अद्याप ५,७४८ जण बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. खराब हवामान आणि सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे केदारनाथ मंदिराजवळील चिखलमाती उचलण्याच्या कामात अडथळे येत असल्याचे त्यांनी मान्य केले.