२२ वर्षांच्या एका हिंदू तरुणीला दर्ग्यावर नमाज पठण करण्याची संमती उच्च न्यायालयाने दिली आहे. या तरुणीने तिचा धर्म बदललेला नाही. तसंच मुस्लीम तरुणाशी विवाहही केलेला नाही. मात्र आपल्याला नमाज पठण करण्याची संमती मिळावी यासाठी या तरुणीने उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने तिला नमाज पठणाची संमती दिली आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
उत्तराखंड उच्च न्यायालयात एका हिंदू मुलीने याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिने कलियर शरिफ या ठिकाणी नमाज पठण करण्याची संमती मागितली होती. तसंच या मुलीने आपल्याला नमाज पठणाच्या वेळी सुरक्षा पुरवली जावी असंही म्हटलं होतं. त्यानुसार कोर्टाने तिला सुरक्षा प्रदान करण्याचेही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने नमाज पठण करण्याआधी या महिलेला स्टेशन हाऊस ऑफिसरला सुरक्षेसंदर्भात पत्र देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.
खासगी कंपनीत काम करण्याऱ्या मुलीने मागितली संमती
२२ वर्षीय मुलीचं नाव भावना असं आहे. ही मुलगी हरिद्वारच्या सिडकुल या ठिकाणी असलेल्या खासगी कंपनीत काम करते. तिच्याच कंपनीत फरमान नावाचा एक तरुणही काम करतो. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. या मुलीने उत्तराखंड उच्च न्यायालयात नमाज पठण करण्यासाठी संमती मागितली होती. कलियर शरीफ या ठिकाणी मी माझा मित्र फरमानसह नमाज पठण करु इच्छिते असं तिने याचिकेत म्हटलं होतं. कलियर शरीफ या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी गेल्यावर मला काही संघटनांचा विरोध सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस संरक्षण दिलं जावं असंही तिने या याचिकेत म्हटलं आहे. मला नमाज पठण करायला मिळणं हा माझ्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत मिळालेला अधिकार आहे असंही या मुलीने म्हटलं आहे. न्यायमूर्ती मनोज तिवारी आणि न्यायमूर्ती पंकज पुरोहित यांनी या मुलीला नमाज पठणाची संमती दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
कोर्टात तरुणीला विचारण्यात आलं की तुला नमाज पठण का करायचं?
कोर्टात या तरुणीला ही विचारणा करण्यात आली की तू धर्म बदललेला नाहीस. तरीही तुला नमाज पठण का करायचं आहे? त्यावर या तरुणीने उत्तर दिलं की नमाजचा प्रभाव माझ्यावर आहे. मी मुस्लीम धर्म स्वीकारलेला नाही. तसंच मला धर्मही बदलायचा नाही. मी हिंदू धर्माची अनुयायी आहे. मी कुठलीही भीती, आर्थिक लाभ किंवा दबावाखाली येऊन नमाज पठण करु इच्छित नाही असं या तरुणीने कोर्टाला सांगितलं आहे. भावनाने हे उत्तर दिल्यानंतर तिला नमाज पठण करण्याची संमती दिली आहे.