Pushkar Singh Dhami Announcement: उत्तराखंडमधील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकरानं राज्यातल्या एकूण १५ ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हरिद्वार, डेहराडून, नैनीताल व उधम सिंह नगर या चार जिल्ह्यांमधील ठिकाणांचा यात समावेश आहे. सोमवारी यासंदर्भात घोषणा करण्यात आली असून लोकभावना, भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वारसा अशी कारणं यासाठी सरकारकडून देण्यात आली आहे. बदललेल्या नावांमध्ये शिवाजी नगर व ज्योतिबा फुले नगरचाही समावेश आहे.
“उत्तराखंड सरकारनं उचललेलं हे पाऊल म्हणजे भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यातून जनतेला प्रेरणा मिळावी यासाठी घेतलेला निर्णय आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
कोणत्या ठिकाणांची नावं बदलणार?
उत्तराखंड सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या निर्णयाबाबत इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे. या निर्णयानुसार ठिकाणांची नावं बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. नावं बदलल्यानंतर सर्व शासकीय कामकाजासंदर्भातील कादगपत्रांमध्ये या ठिकाणांचा उल्लेख बदललेल्या नावांनिशीच केला जाईल, अशी माहिती उत्तराखंड सरकारकडून देण्यात आली आहे.
हरिद्वार जिल्हा
औरंगजेबपूर – शिवाजी नगर
गजिवली – आर्य नगर
चांदपूर – ज्योतिबा फुले नगर
मोहम्मदपूर जाट – मोहनपूर जाट
खानपूर कुर्सली – आंबेडकर नगर
इंद्रिशपूर – नंदपूर
खानपूर – श्री कृष्ण पूर
अकबरपूर फझलपूर – विजयनगर
डेहराडून जिल्हा
मियावाला – रामजी वाला
पिरवाला – केसरी नगर
चांदपूर खुर्द – पृथ्वीराज नगर
अब्दुल्ला नगर – दक्ष नगर
नैनिताल जिल्हा
नवाबी रोड – अटल मार्ग
पंचक्की-आयटीआय रस्ता – गुरु गोळवलकर मार्ग
उधम सिंह नगर जिल्हा
सुलतानपूर पत्ती – कौशल्या पुरी
हा ऐतिहासिक निर्णय – भाजपा
दरम्यान, भारतीय जनता पक्षानं हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्ष या निर्णयाचं स्वागत करतो. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यातून लोकांना प्रेरणा देण्याचं काम एकीकडे या निर्णयामुळे होत आहे. तर दुसरीकडे परकीय आक्रमकांनी केलेल्या अन्यायाचीही जाणीव लोकांना यातून होईल”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माध्यम प्रमुख मानवीर चौहान यांनी दिली.