उत्तराखंडला गेल्या आठ दिवसांपासून बसलेल्या महाप्रलयाच्या तडाख्यात अद्यापही जवळपास नऊ हजार यात्रेकरू अडकले असून मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे अडकून पडलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या मोहिमेला विलंब लागला. मात्र हेलिकॉप्टरच्या सहाय्याने यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. केदारनाथ येथून आणखी १२७ मृतदेह मिळाल्याने या महापुरातील बळींची संख्या आता ८२२ वर पोहोचली आहे. तेहरी जिल्ह्य़ात दरडी कोसळल्याने एक महिला आणि एक लहानगा ठार झाल्याचे वृत्त आहे.
डेहराडूनमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पसरले असल्याने महापुरात अडकलेल्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याच्या मोहिमेला मंगळवारी विलंब झाला. मात्र हवामानात लक्षणीय सुधारणा होताच सहस्रधारा हेलिपॅड आणि जॉली ग्रॅण्ट विमानतळ येथून मदतकार्याने वेग घेतला.चार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बद्रिनाथ येथून ६० यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केदारनाथ परिसरातून सोमवारपासून १२७ मृतदेह मिळाले आहेत. मुझफ्फरनगर, बुलंदशहर आणि बिजनोर येथे गंगा नदीत किमान १५ यात्रेकरूंचे मृतदेह तरंगताना आढळल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहावयास मिळाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महाप्रलयातील बळींची संख्या आता ८२२ वर पोहोचली आहे.
वेगाने सुरू करण्यात आलेल्या मदतकार्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पूरग्रस्त परिसरात कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला जाण्याची परवानी न देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सकाळी पाटणा येथे सांगितले. उत्तराखंडमधील पूरस्थिती हळूहळू सुधारत असून मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे. केदारनाथ आणि बद्रिनाथ येथून अनेक भाविकांना बाहेर काढण्यात आले असून अद्याप अडकून पडलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी ३७ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
या परिस्थितीत कोणत्याही रोगाची लागण होऊन नये यासाठी केदारनाथ येथे सापडलेल्या मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. देवदार वृक्षाची लाकडे आणि तूप भरलेले ट्रक केदारनाथला पाठविण्यात आले असून मृतांची ओळख पडल्यावर त्याचप्रमाणे शवविच्छेदन झाल्यावर आणि डीएनए चाचणीची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याच परिसरात त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे राज्य पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले.
मृतदेह सडण्यास सुरूवात झाली असून वातावरणात एक प्रकारचा कुबट वास पसरला असल्याने रोगाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पलीस उपमहानिरीक्षक संजय गुंजयल आणि गढवाल क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अमित सिन्हा यांना केदारनाथ येथे अन्त्यसंस्काराच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे ४२ जणांचे पथक केदारनाथसाठी रवाना झाले असून ते शवविच्छेदन करून डीएनए नमुने गोळा करण्याचे काम करणार आहे.