उत्तराखंड राज्यातील जलप्रलयानंतर सुरू झालेले बचावकार्य अंतिम टप्प्यात आले असून बद्रिनाथ आणि हर्शिल येथे मात्र अद्यापही अडीच हजार जण अडकले आहेत. तसेच अजूनही सुमारे तीन हजार जणांचा ठावठिकाणा कळू न शकलेला नाही.
साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मातीच्या ढिगाखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे तसेच मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल, अनेकदा कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अजूनही अडथळे येत आहेत. मात्र या साऱ्या आव्हानांवर मात करीत संयुक्त बचाव पथकांद्वारे बद्रिनाथ येथून एक हजार जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले असून हर्शिल येथून ५११ जणांची सुटका करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे उपाध्यक्ष शशीधर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेपासून १२ दिवसांत एक लाख चार हजार पंचाण्णव लोकांची बचाव पथकांमार्फत सुटका करण्यात आली आहे.
मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्याची जबाबदारी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रवीनाथ रामन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बुधवारी १८ तर गुरुवारी १६ मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले. प्रत्येक मृतदेहाचे डीएनए नमुने गोळा करून, त्या मृतदेहाची ओळख पटवून घेऊन मगच त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात येत आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. या कामासाठी डॉक्टर, तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक शास्त्रज्ञांचा नवीन चमू उत्तराखंड राज्यात दाखल झाला आहे. लष्कर, भारतीय हवाई दल, इंडो तिबेटिअन बॉर्डर पोलीस फोर्स आणि राषट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था यांच्यातील उत्तम समन्वयामुळे ‘ऑपरेशन सूर्य होप’ येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास या बचावकार्याचे कमांडर इन चीफ लेफ्ट. जन. अनिल चैत यांनी व्यक्त केला. मात्र तीन हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेणे हे बचाव कार्य करणाऱ्यांसमोर असलेले मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. वातावरणात मृतदेहांची दरुगधी पसरली असून नदीचे प्रदूषित पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेला कचरा यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. केंद्र सरकारने मात्र उत्तराखंडात कोणत्याही आजाराची साथ आली नसल्याचे सांगितले आहे.
राज्यातील २०४ जण अजूनही बेपत्ताच
मुंबई : उत्तराखंडमधील संकटग्रस्त पर्यटकांना वाचिवण्यासाठी लष्कराकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी राज्यातील २०४ पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणाच लागलेला नाही. या बेपत्तांमध्ये सर्वाधिक संख्या नागपूर आणि औरंगाबादमधील पर्यटकांची आहे. बद्रीनाथमध्ये अडकलेल्या पर्यटकांपैकी गुरुवारी ९२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील सुमारे साडेतीन हजार पर्यटक उत्तराखंडमध्ये गेले होते. गेल्या आठवडय़ातील भीषण संकटानंतर बद्रीनाथ, गौेरीकुंड, केदारनाथ आदी ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आण्यासाठी राज्य सरकाने मदत पथक पाठविले असून आतापर्यंत सुमारे तीन हजार पर्यटक परत आले आहेत. मात्र अजूनही काहीजण बद्रीनाथमध्ये अडकले असून हवामान येत्या दोन दिवसात सर्वाची सुटका होण्याची शक्यता आहे.
एव्हरेस्टवीरांचीही मदत
पुणे : उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेक दुर्गम-डोंगराळ भागात मदतीसाठी जवानांच्या जोडीला आता पुण्यातील गिर्यारोहक धावले आहेत. ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली दहा गिर्यारोहक आणि दोन डॉक्टरांचे पथक गुरुवारी उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहे. हे सर्व गिर्यारोहक उत्तराखंडमध्ये पिठोरगड जिल्हय़ातील असकोट, मोरी आणि धरसुला भागात मदतकार्य करणार आहेत. या भागात अद्याप पुरेशी मदत पोहोचलेली नाही. तसेच अतिउंचीवरील डोंगराळ भागामुळे इथे अनेक ठिकाणी गिर्यारोहण तंत्राची मदत उपयोगी पडणार असल्याचे झिरपे यांनी सांगितले. उत्तराखंडमधील या आपत्तीत अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते वाहून गेले आहेत. अनेक अडथळे तयार झाले आहेत. या साऱ्यांवर मात करण्यासाठी गिर्यारोहणाच्या साधनांचा उपयोग करत बचाव करावा लागणार असल्याचेही झिरपे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा