उत्तराखंडात आज शनिवार सकाळी खराब हवामानामुळे मदत कार्याला अडथळे निर्माण होत होते. परंतु, आता हवामानात सुधार झाल्याने बद्रीनाथ पट्ट्यात पुन्हा एकदा मदत कार्याला सुरूवात झाली आहे आणि तेथून दोनशे यात्रेकरूंना वाचविण्यात यश आले आहे. सुरक्षा दलाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मदतकार्य अंतिम टप्प्यात आहे आणि बद्रीनाथ परिसरातून आणखी १४०० यात्रेकरूंच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हवामानाने साथ दिली तर, आज शनिवार रात्री पर्यंत मदतकार्य पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी जिल्ह्यांतील सहाशेहून अधिक गावांमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आवश्यक साहाय्य साहित्य पुरविण्यात येत आहे. या गावांमध्ये आतापर्यंत २३७९ टन गहू व २८७५ टन तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. केदारघाटी परिसरातील बचावकार्य पूर्ण झाले असल्याचे सैन्यदलाचे अधिकारी बिकराम सिंग यांनी सांगितले. तसेच आता बद्रीनाथ पट्ट्याकडे लक्ष्य केंद्रीत केले असल्याचेही ते म्हणाले.