उत्तराखंडमध्ये विमानतळ प्राधिकरणात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासी संकुलात सदर अधिकारी महिलांच्या वेशात मृत पावल्याचे दिसून आले. यावेळी त्याने कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हातात बांगड्या, महिलांचे अंतर्वस्त्र आणि महिलांचा गाऊन घातला होता. सदर अधिकाऱ्याने हा वेश का धारण केला होता, याची कुणालाही कल्पना नाही. पोलिसही याचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर अधिकाऱ्याने आत्महत्या केली असावी, असाही एक संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर अधिकाऱ्याची पत्नी शिक्षिका असून पतीच्या निधनावेळी ती पिथौरीगड याठिकाणी होती.

टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. उधम सिंह नगरच्या पोलीस अधीक्षक मंजूनाथ टीसी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, अधिकाऱ्याचा बराच वेळ काही संपर्क झाला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी घरातील बेडरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना हे भयानक चित्र दिसले.

सुषमा स्वराज यांच्या कन्येचं आईच्या पावलावर पाऊल, संसदेत शपथ घेण्यासाठी…

पोलिसांनी सांगितले की, गळफास घेतलेल्या अधिकाऱ्याला नातेवाईकांनी खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी ते मृत असल्याचे सांगितले. त्यांच्या शरीरावर मारहाण किंवा झटापटीच्या जखमा नव्हत्या. बेडरुममध्येही कुणी बळजबरीने घुसल्याचे काहीच पुरावे आढळले नाहीत. बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

विमानतळ प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सदर अधिकाऱ्याच्या खोलीत आणखी दोन नातेवाईक होते. त्यांनी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारल्या. सकाळी आपण आपल्या गावी निघायचे आहे, असे त्यांचे ठरले होते. नंतर ते वेगवेगळ्या खोलीत झोपायला गेले. पोलिसांनीही याला दुजोरा दिला. रात्री तिघांनीही जेवण केल्यानंतर नातेवाईक वेगळ्या खोलीत झोपायला गेले. तर मृत अधिकारी त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी अनेक फोन करूनही अधिकारी प्रतिसाद देत नसल्यामुळे खोलीतील नातेवाईकांनी आजूबाजूला राहणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

Porsche Accident: मद्यधुंद अवस्थेत पोर्श चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

इतर अधिकारी आणि नातेवाईकांनी सकाळी अधिकाऱ्याच्या खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अधिकाऱ्याचा मृतदेह दिसला. तसेच यावेळी त्याने महिलांचा वेश केला असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पोलीस आता या प्रकरणात नातेवाईक आणि इतर अधिकारी वर्गाची चौकशी करत आहेत.