उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत ५० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. सर्व पोलिसांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून कठोर पावलं उचलली जात आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत धामी यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आणि इंटेलिजन्सच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. बैठकीनंतर धामी यांनी राज्यात शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासह दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा बांधण्यात आला होता. या परिसरात गुरुवारी (८ फेब्रुवारी) नमाज पठणाच्या वेळी मोठा गोंधळ सुरू होता. दरम्यान, महापालिकेचं पथक जेसीबी घेऊन हा मदरसा पाडण्यासाठी मलिक बागेजवळ दाखल झालं. परंतु, तिथे काही समाजकंटकांनी महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस, महापालिका अधिकारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत. दरम्यान, या भागात मोठी दंगल उसळली आहे.

हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या वाहनांना आग लावली. तसेच घटनेची बातमी देण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची वाहनंदेखील पेटवली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात ५० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. यानंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> दिल्ली-नोएडा सीमेवर मोठी वाहतूक कोंडी; शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त, क्रेन-बुलडोझर तैनात

अवैध मदरसा आणि नमाज पठणासाठी बांधलेली इमारत महापालिकेने जेसीबीद्वारे जमीनदोस्त केली आहे. यावेळी शेजारच्या अनधिकृत वसतीमधील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या अनधिकृत वसतीवरही कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दंगल उसळल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी कुठलाही प्रतिहल्ला केला नव्हता. सुरुवातीला पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand shoot at sight order issued in banbhoolpura demolition drive sparks tension asc