उत्तरकाशी : यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा बोगद्यात गेल्या ७२ तासांपासून अडकलेल्या ४० कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नांत बुधवारी मोठा अडथळा निर्माण झाला. या बोगद्याचे बांधकाम सुरू असतानाच त्याचा एक भाग कोसळल्याने हे मजूर आतमध्ये अडकले आहेत. मजुरांच्या सुटकेसाठी दुसरा तात्पुरता बोगदा खोदण्याचे काम सुरू असताना नव्याने भूस्खलन झाल्याने हे खोदकाम थांबवावे लागले.
यासंबंधी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री साडेबारापर्यंत येथील ढिगाऱ्यात मोठय़ा व्यासाचे पोलादी पाइप टाकण्यासाठी खोदकाम काम सुरू होते; परंतु पुन्हा झालेल्या भूस्खलनामुळे ते थांबवावे लागले. दरम्यान, सिल्क्यरा बोगद्यात खोदकामासाठी बसवलेले यंत्रही नादुरुस्त झाले आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. पोलीस महासंचालक अशोककुमार यांनी डेहराडून येथे सांगितले की, दिल्लीहून मोठी यंत्रे हवाई दलाच्या मालवाहू विमानाने घटनास्थळी पाठवली जातील. त्यांच्या साहाय्याने कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगवान होईल.
हेही वाचा >>> रवांडाच्या निर्वासितांना परत पाठवण्याचा निर्णय बेकायदा! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ब्रिटनच्या सरकारला धक्का
अडकलेल्या कामगारांना मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळपर्यंत बाहेर काढण्यात यश येईल असा विश्वास राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव रणजित सिन्हा यांनी सोमवारी बोलताना व्यक्त केला होता. मात्र, त्यामध्ये अडथळे येत आहेत. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना ‘पाइप’द्वारे ऑक्सिजन, पाणी, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थ, वीजपुरवठा, औषधे आदींचा पुरवठा सातत्याने केला जात आहे.
नातलगांची संतप्त निदर्शने
सिल्क्यरा बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास होत असलेल्या विलंबामुळे या मजुरांच्या कुटुंबीयांसह नातलगांच्या संतापाचा बुधवारी उद्रेक झाला. ढिगाऱ्याच्या आत पाइप बसवून मजुरांच्या सुटकेसाठी ‘एस्केप टनेल’ तयार करण्यासाठी बसवलेली यंत्रे काम करत नसल्याने आणि या उपायांशिवाय इतर पर्यायी योजना नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.