उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि या मजुरांचे मनोबल कायम राखण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
बोगद्याच्या खोदकामाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेले अर्नाल्ड डिक्स हे गेल्या नऊ दिवसांपासून बचावासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी अपघातस्थळी आले आहेत. डिक्स हे जीनिव्हा येथील ‘इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन’चे प्रमुख आहेत.
केंद्र सरकारकडून बचाव मोहिमेसाठी आवश्यक ती उपकरणे व संसाधने पुरवण्यात येत असून, केंद्र आणि राज्याच्या यंत्रणांच्या परस्पर समन्वयातून, अडकलेल्या मजुरांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >>> चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर
या बोगद्यात सुरू असलेल्या बचाव मोहिमेबाबत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी तिसऱ्यांदा संवाद साधला आहे.
अडकलेल्या मजुरांची लवकरच सुरक्षितपणे सुटका करण्यात येईल, अशी आशा अर्नाल्ड डिक्स यांनी व्यक्त केली. ‘प्रचंड काम झाले आहे’ असे सांगत त्यांनी आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले. मात्र बचाव मोहीम किती काळ चालेल हे त्यांनी सांगितले नाही.
मजुरांच्या नातेवाईकांचा खर्च सरकार करणार
गेल्या आठवडाभरापासून अधिक काळ सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या नातेवाईकांचा प्रवास, अन्न व निवास यांचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार आहे.
अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका केली जाईल अशी हमी धामी यांनी मजुरांच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांची कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देल्या आहेत, असे त्यांनी सोमवारी सांगितले.
मजुरांच्या खुशालीची माहिती घेण्यासाठी सिलक्यारा येथे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांचा खर्च राज्य सरकार उचलेल.
मजुरांच्या सुटकेसाठी हवन
उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी दर्शनचे उपाध्यक्ष विजय गोयल यांनी सोमवारी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात ‘हवन’ केले. ‘अडकलेल्या मजुरांच्या कल्याणासाठी व सुरक्षित सुटकेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून, हे सामान्य लोक असल्यामुळे इतरांनाही आम्ही या प्रार्थनेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत,’ असे गोयल म्हणाले.