उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ११७ मदरशांमध्ये आता रामाचं चरित्र शिकवलं जाणार आहे. मदरशांच्या नव्या अभ्यासक्रमात हा समावेश करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून मदरशांच्या अभ्यासक्रमात बदल केला जाईल आणि रामाचं चरित्र अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल.
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स काय म्हणाले?
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, “यावर्षी मार्चमध्ये प्रारंभ होणार्या सत्रात नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. श्रीराम हे प्रत्येकासाठी अनुकरणीय आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे. वडिलांना त्यांचे वचन पूर्ण करण्यास साहाय्य करण्यासाठी श्रीराम सिंहासन सोडून वनात गेले. श्रीरामसारखा मुलगा कुणाला नको असेल ? मदरशातील विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद यांच्यासह श्रीरामांचे जीवनही शिकवले जाईल.”
संपूर्ण देशात रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा जो पार पडला त्याचा उत्साह होता. त्यामुळे आम्हालाही ही वाटलं की रामाचा आदर्श हा मदरशांमध्येही शिकवला गेला पाहिजे. अल्लामा इक्बाल हे आमचे प्रख्यात कवी आहेत त्यांनी भगवान रामाला इमाम ए हिंद अर्थात भारताचे नेते, भारताचे राजे असं संबोधलं आहे. भारतीय मुस्लिम समाजानेही रामाच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आम्ही आमच्या पूर्वजांना बदलू शकत नाही पण आम्ही बदल घडवू शकतो असंही शादाब शम्स यांनी म्हटलं आहे.
प्रभू राम सर्वांचा आहे. वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा रामासारखा मुलगा. त्याला साथ देणारा लक्ष्मणासारखा भाऊ आणि त्याची पत्नी सीता यांचा आदर्श ठेवायला कुणाला आवडणार नाही? आम्ही मदरशांमधून औरंगजेब शिकवणार नाही. मात्र रामाचा आदर्श आमच्या मुलांना नक्कीच शिकवू. कारण औरंगजेबाने वडिलांना आणि भावाला राज्यासाठी मारुन टाकलं होतं. हा इतिहास शिकवला जाण्यापेक्षा रामाचं चरित्र शिकवलेलं केव्हाही चांगलं असंही शम्स यांनी म्हटलं आहे.