ज्येष्ठ भाजपा नेते विनोद आर्या यांच्या मुलाच्या रिसॉर्टमधून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय रिसेप्शनीस्ट तरुणीचा मृतदेह उत्तराखंड पोलिसांना सापडला आहे. या तरुणीचा मृतदेह रिसॉर्टजवळ असलेल्या चिल्ला पावर हाऊस परिसरातील कालव्यात सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्यासह दोन साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
वैयक्तिक वादानंतर तरुणीला रिसॉर्टजवळील कालव्यात ढकलून दिल्याची कबूली पोलीस चौकशीत आरोपींनी दिली होती. त्यानुसार शोध घेतल्यानंतर पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, तरुणीचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (SDRF) पाचारण केले होते. मृतदेह शोधण्यासाठी गंगा नदीवरील पशुलोक धरणाचे दरवाजे उघडण्याची विनंतीही पोलिसांनी राज्य सरकारकडे केली होती.
प्रकरण काय आहे?
उत्तराखंडमधील पौरी गर्हवालमध्ये भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांचे ‘वनतारा’ हे रिसॉर्ट होते. या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तरुणीचे कुटुंबीय आणि पुलकित आर्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात सखोल तपास केल्यानंतर तरुणीचा खून पुलकित आर्या, रिसोर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानंतर ‘वनतारा’ रिसॉर्ट पाडण्यात आले आहे.