डेहराडून : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना अन्न पदार्थापेक्षा प्राणवायूची गरज आहे. अडकलेल्या कामगारांनी प्राणवायू पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. बचावकार्य करणाऱ्या चमूचे कर्मचारी कामगारांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी वॉकी टॉकीद्वारे कामगारांशी चर्चा केली. सिल्क्यारा बोगद्यात ४० कामगार अडकले त्याला ५० तासांहून अधिक काळ झाला आहे. कामगारांना वाचवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत. काल कामगारांशी संपर्क होत नव्हता त्यामुळे सगळे घाबरले होते. मात्र, त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांच्याशी संपर्क झाला, अशी माहिती पीआरडी जवान रणवीर सिंह चौहान यांनी दिली. अडकलेल्या कामगारांना चिठ्ठीद्वारे संदेश पाठवण्यात आला. आतमध्ये जेवण पाठवण्यात आले. ते कामगारांपर्यंत पोहोचले. आता त्यांनी प्राणवायूची मागणी केली आहे. मजुरांना निरंतर प्राणवायू पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कीर्तीकर, कदम वादावर अखेर पडदा; माध्यमांशी बोलताना कदम यांनी व्यक्त केली खदखद
सरकारकडून या बोगद्याची जबाबदारी एनएचआयडीएसीएल कंपनीला देण्यात आली आहे. या बोगद्याचे बांधकाम नवयुग या कंपनीकडे सोपवण्यात आल आहे. एनएचआयडीसीएलचे कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) संदीप सुधेरा म्हणाले, बोगद्याच्या आतून २१मीटपर्यंतचा ढिगारा उपसण्यात आला आहे. अजूनही १९ मीटपर्यंत मलबा पडलेला आहे. त्यात अडकलेले सर्व लोक सुरक्षित आहेत. बोगद्यातून मशीनद्वारे माती किंवा ढिगारा काढताना लगेचच भिंतींवर काँक्रिट शॉटक्रिट फवारले जाते. यामुळे काही वेळासाठी भूस्खलन कमी होते उत्तरकाशीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले, रात्री मजुरांशी आमचा संपर्क झाला होता.
एनएचआयडीसीएलच्या ज्या पाईपलाईनमधून पाणी आणि प्राणवायू पुरवला जातो त्याद्वारचे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आतल्या लोकांनी ते ठीक असल्याचे सांगितले. अडकलेल्या कामगारांपैकी फक्त एकच उत्तराखंडचा आहे. उर्वरित कामगार बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, बोगद्याच्या वरच्या बाजूचा अंदाजे ५० मीटर भाग कोसळला असून तो प्रवेशद्वारापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे.
पंतप्रधानांनी घेतली मदतकार्याची माहिती
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून उत्तरकाशीतील घटनेची माहिती घेतली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे धामी यांनी सांगितले.
नेत्यांच्या भेटीमुळे अडथळा
मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुर्घटनास्थळी स्थानिक नेते वारंवार येत असल्यामुळे या मदतकार्यात अडथळा येत आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी जी. एल. नाथ यांनी दिली.