उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे असं सांगितलं जात होतं. परंतु, या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. कारण, बचाव मोहिमेसाठी अमेरिकेहून आलेल्या खोदकाम तज्ज्ञाने सांगितलं की या कामगारांना बाहेर काढण्यास खूप वेळ लागणार आहे. बचाव मोहीम राबवणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमडीएमए) मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सांगितलं की, अवघ्या १५ मीटरचं खोदकाम बाकी असून बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटेपर्यंत मजूर सुखरूप बाहेर येऊ शकतील. परंतु, अंतिम खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे बचाव मोहीम आता लांबवली आहे.
खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. खोदकामासाठी मागवलेल्या अमेरिकन ऑगर मशीन सतत बिघडत आहेत. ही मशीन आतापर्यंत अनेकदा बिघडली आहे. आज दुपारीदेखील ही मशीन बिघडली असून दुरुस्तीचं काम सुरू आहे. मशीन दुरुस्त करण्यासाठी दिल्लीहू तज्ज्ञांचं पथक उत्तरकाशीत दाखल झालं आहे. खोदकाम करून ३२ इंच रुंदीची नलिका (पाइप) टाकून या मजुरांना नलिकेच्या मार्गाने बाहेर काढलं जाणार आहे. परंतु, पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून (२३ नोव्हेंबर) कोणतीही प्रगती झालेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही या बातमीची पुष्टी केली आहे.
अवघ्या काही तासांमध्ये मजुरांना बाहेर काढलं जाईल असा दावा करणारे अधिकारी आता कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत. याउलट मजुरांची सुटका कधी होईल याबाबत माध्यमांनी कोणतेही अंदाज वर्तवू नयेत असं आवाहन एमडीएमएने केलं आहे. बोगद्यात १३ दिवसांपासून ४१ मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी ढिगाऱ्यातून खोदकाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आतपर्यंत पाइप टाकले जात आहेत. मात्र, या कामात सतत नवनवी विघ्नं येत आहेत. कधी तांत्रिक तर कधी नैसर्गिक कारणांमुळे काम ठप्प होत आहे. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
यादरम्यान, अमेरिकेहून आलेले टनलिंग एक्सपर्ट (बोगद्यासाठीच्या खोदकामातले तज्ज्ञ) अर्नॉल्ड डिक्स यांनी केलेलं वक्तव्य सर्वांच्या चिंता वाढवणारं आहे. अर्नॉल्ड डिक्स म्हणाले, “येत्या नाताळपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत हे मजूर त्यांच्या घरी जातील.” दुसऱ्या बाजूला बचाव मोहिमेतील वरिष्ठ अधिकारी रोज नवनवी माहिती देत आहेत, नवनव्या तारखा देत आहेत. बचाव मोहिमेला बराच वेळ लागेल ही गोष्ट अर्नॉल्ड यांच्या वक्तव्यामुळे पक्की झाली आहे. तसेच ते म्हणाले, इथून पुढच्या खोदकामात ऑगर मशीन कामी येणार नाही. मजुरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या वरून खोदकाम करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी (उभ्या दिशेने खोदकाम) गरजेच्या मशीन्स बोगद्याच्या वर नेण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा >> विश्लेषण : उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : कामगारांच्या सुटकेला विलंब का?
ज्या ऑगर मशीनच्या सहाय्याने आतापर्यंतचं खोदकाम केलं आणि बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मजुरांना बाहेर काढलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता, ती मशीनच आता या बचाव मोहिमेसमोरचा मोठा अडथळा बनली आहे. ज्या मशीनची सर्वाधिक चर्चा होत आहे ती मशीन सतत बिघडत आहे. दर काही तासांनी ही मशीन बिघडते, मग त्यानंतर ती दुरुस्त केली जाते. या काळात बचाव मोहीम ठप्प होते. खोदकामाचं बहुतांश काम या मशीनच्या सहाय्याने झालं असलं तरी आता ही मशीन सतत बिघडत आहे. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा येत आहे. या सळ्यांमुळे मशीन बिघडतेय. परिणामी खोदकाम थांबवावं लागत आहे.