नवी दिल्ली, उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्यामध्ये अडकलेले ४१ कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत मंगळवारी ‘एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) प्रसृत केली. कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी मंगळवारी आडव्या दिशेने खोदकाम करण्यास सुरूवात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाडय़ांवर प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत उभ्या दिशेने खोदकाम करताना खडक लागत असल्यामुळे आडव्या दिशेने खोदण्यावर भर दिला जात आहे’’, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य लेफ्ट. जरनल (निवृत्त) सय्यद अता हस्नैन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> युद्धविराम, ओलिसांची सुटका दृष्टीपथात; हमासबरोबर करारासाठी सकारात्मक चर्चा; इस्रायलच्या युद्धकालीन मंत्रिमंडळाची बैठक

कामगारांच्या सुटकेसाठी मंगळवारी दहाव्या दिवशी बचावकार्य सुरू होते. अमेरिकी ‘ऑगर मशीन’द्वारे मोठय़ा व्यासाचे पोलादी पाईप टाकून सुटकेचा मार्ग तयार करण्याचे काम तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीहून ‘एंडोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमेरा’ आणल्यानंतर बंद बोगद्यात तो सोडण्यात आला. या कॅमेऱ्याद्वारे केलेल्या चित्रीकरणात पांढऱ्या रंगांचे हेल्मेट घातलेले कामगार पाईपलाइनद्वारे मिळत असलेली भोजनसामग्री घेत असताना आणि परस्परांशी बोलताना दिसत आहेत. ती चित्रफीत पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

बोगद्याचा काही भाग खचल्यानंतर ढिगाऱ्याला आरपार भेदून टाकण्यात आलेल्या ५३ मीटर लांबीच्या आणि सहा इंच व्यासाच्या पाइपलाइनद्वारे सोमवारी या अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली. ही खिचडी मोठय़ा तोंडाच्या प्लास्टिक बाटल्यांत बंदिस्त करून या मजुरांपर्यंत पाठवण्यात आली. याआधी चार इंच व्यासाच्या पाइपलाइनद्वारे मजुरांना भोजन, पाणी, औषधे आणि प्राणवायूचा पुरवठा केला जात होता.

कामगार सुखरूप आहेत. आधी आमचा आवाज ऐकू जावा, यासाठी आम्हाला मोठय़ाने ओरडावे लागत होते, पण आज त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला, असे एका कामगाराच्या नातलग स्मिता हेम्बरम यांनी सांगितले.

पाइपलाइनद्वारे अन्न अन् संवाद

मजुरांना सहा इंची व्यासाच्या पाइपलाइनद्वारे खिचडी पाठवल्यानंतर काही तासांनी बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्याकडे कॅमेरा पाठवला आणि त्याद्वारे अडकलेले सर्व मजूर सुखरूप असल्याची पहिली चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली. अडकलेल्या काही कामगारांशी संवादही साधण्यात आला. या पाइपलाइनद्वारे खिचडी, कापलेले सफरचंद, केळी पाठवण्यात आली आहेत. कामगारांना ‘वॉकी-टॉकी’ आणि दोन चार्जरही पाठवण्यात आल्याचे बचाव मोहिमेचे प्रमुख कर्नल दीपक पाटील यांनी सांगितले.

मोदींकडून पुन्हा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी संपर्क करून बचाव आणि मदतकार्याची माहिती घेतली. बचावकार्याबाबत पंतप्रधानांनी आतापर्यंत चार वेळा धामी यांच्याशी संपर्क करून आढावा घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarkashi tunnel collapse video footage show workers trapped in the tunnel are safe zws