२०१६ साली तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळे फक्त एडीएमकेच नसून तामिळनाडूच्याच राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या नंतर त्यांच्या एकेकाळच्या सहकारी व्ही. के. शशिकला त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून राजकीय सूत्र हाती घेतील, असं बोललं जात होतं. मात्र, २०१७मध्ये त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. मात्र, आता पुन्हा एकदा त्या तामिळनाडूच्या राजकारणात आणि अद्रमुकच्या पक्षीय संरचनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा ‘अम्मा’ राज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्याच नावाच्या कोनशिलेचं केलं उद्घाटन!
नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये अद्रमुक पक्षाचा मोठा पराभव झाला. सत्ता हातून गेल्यानंतर पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका निभावायला सुरुवात केली. एकीकडे करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू राज्य सरकार कार्यरत असताना विरोधी पक्षात मात्र खंद्या नेत्याची कमतरता असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासोबत पक्षातील समन्वयकांच्या मदतीने सध्या पक्षाचा गाडा हाकला जात आहे. त्यासाठी सक्षम नेतृत्वाची पोकळी भरणं आवश्यक ठरलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शशिकला यांनी १७ ऑक्टोबरला आपल्याच नावाच्या एका कोनशिलेचं उद्घाटन करून खळबळ उडवून दिली होती.
शशिकला यांना २०१७मध्ये चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच वर्षाच्या सुरुवातीला त्या तुरुंगातून मुक्त झाल्या. मात्र, त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी आपण सक्रीय राजकारणापासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण याच महिन्यात १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी पुन्हा एकदा आपण राजकारणात आल्याचं आपल्या कृतीतून जाहीर केलं. स्वत:चा अद्रमुकच्या जनरल सेक्रेटरी म्हणून उल्लेख असलेल्या एका कोनशिलेचं त्यांनी उद्घाटन केलं. त्यामुळे अद्रमुक पक्षात खळबळ उडाली.
पनीरसेल्वम यांचा सावध पवित्रा!
एकीकडे शशिकला यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली पक्षात सुरू असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मात्र सावध पवित्रा घेत शशिकला यांच्या राजकीय एंट्रीविषयी भाष्य केलं आहे. “एमजीआर यांनी एआयडीएमके पक्षाची स्थापना काडरवर आधारित केली होती. अजूनही पक्ष त्याच तत्वांवर चालतो आहे. सध्या पक्ष समन्वयक आणि सहसमन्वयक यांच्या दुहेरी नेतृत्वाखाली कामकाज करतो आहे. शशिकला यांच्या पक्षातील प्रवेशाविषयी मुख्यालयातील पदाधिकारी चर्चा करून निर्णय घेतील”, असं पनीरसेल्वम म्हणाले आहेत.
व्ही. के. शशिकला यांचा पक्षात प्रवेश झाल्यास, जयललिता यांच्यानंतर पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये ‘अम्मा’ राज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.