देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला कालपासून (२१ जून) सुरूवात झाली आहे. लस तुटवडा आणि लसीकरणाच्या धोरणावरून विरोधकांसह सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावल्यानंतर केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, आता लसीकरणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे, आयआयटी संस्था आणि अधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थांना एक आदेश दिला आहे. ज्यात मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे बॅनर्स विद्यापीठात लावण्यास सांगण्यात आले आहेत.
२१ जूनपासून देशात १८ वर्षांपुढील सर्वांच्या मोफत लसीकरणाला सुरूवात झाली. त्यापूर्वीच म्हणजे २० जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना हे आदेश दिले आहेत. बॅनर्स कशा पद्धतीचं असावे, याबद्दलचं डिझाईनही विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितलं आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत हे बॅनर्स आहेत. विद्यापीठांमध्ये लावायच्या बॅनर्सचे डिझाईन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने तयार करून दिले आहे. या बॅनरवर ‘सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी मोदीजी, धन्यवाद,’ असा आशयाचा मजकूर आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. बनरवर पंतप्रधान मोदी यांचा फोटोही आहे. विद्यापिठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये बॅनर्स लावण्याच्या आदेशावर यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगलं आहे. तर माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा- COVID-19 vaccination in india : लसीकरणाचा विक्रम
दिल्ली विद्यापीठाने अशा स्वरूपाचे बॅनर्स विद्यापीठ परिसरात लावले आहेत. इतकंच नाही, तर विद्यापीठाशी सलग्नित संस्थांनाही त्यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केलं आहे.
Free Vaccination for all above 18 years of age. #CovidVaccination
World’s largest free vaccination campaign begins today. @UnivofDelhi South Campus@PMOIndia @mygovindia @EduMinOfIndia @ugc_india pic.twitter.com/IMSIlw9yVn— University of Delhi (@UnivofDelhi) June 21, 2021
कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात यूजीसीने काय म्हटलं आहे?
विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापिठांचे कुलगुरू आणि यूजीसी अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना पत्र पाठवलं आहे. २० जून रोजी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. “केंद्र सरकार उद्यापासून (२१ जून) १८ वर्षांपुढील सर्वांचं मोफत लसीकरण मोहीम सुरू करत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी त्यांच्या परिसरात होर्डिग्ज/बॅनर्स लावावेत,” असं या पत्रात म्हटलेलं आहे.