करोनाने संपुर्ण जगात हाहाकार केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. भारतात देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतात आतापर्यंत ३७ करोडपेक्षा अधिक करोना डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात गेल्या २४ तासांत २७ लाखापेक्षा अधीक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असला तरी देशात काही राज्यात करोनाचे आकडे वाढत आहेत. देशातील करोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी झाली. मात्र धोका टळलेला नाही. एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.
India’s cumulative vaccination coverage has crossed the 37 crore mark with more than 27.86 lakh vaccines administered today: Government of India
— ANI (@ANI) July 9, 2021
करोना लशींच्या १.८३ कोटी मात्रा राज्यांकडे शिल्लक
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना करोना लशीच्या ३७ कोटींहून अधिक (३७,९३,५६,७९०) मात्रा आतापर्यंत पुरवण्यात आल्या असून, आणखी २३ लाख ८० हजार मात्रा त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या बेतात आहेत. यापैकी वाया गेलेल्या लशी जमेला धरून एकूण वापर ३६,०९,६९,१२८ मात्रा इतका आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. याचबरोबर, १.८३ कोटींहून अधिक (१,८३,८७,६६२) मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच खासगी रुग्णालयांकडे देण्यासाठी उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे.
नवीन बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी आहे
अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने ही सूचना जारी केली आहे. दरम्यान, देशातील सर्व हिलस्टेशन्स ते बाजारपेठेतील गर्दी होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या करोनाच्या नवीन बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी भारतात एकूण ४३,३९३ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे. आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.