मुंबईचा प्रसिद्ध असलेल्या वडापावला जागतिक ख्याती मिळाली आहे. सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड असलेला वडापाव महाराष्ट्राशिवाय भारताच्या इतर भागातही प्रसिद्ध आहे. अलीकडेच, वडापावला जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविचमध्ये स्थान मिळाले आहे. लोकप्रिय खाद्यपदार्थ आणि प्रवास मार्गदर्शक ‘टेस्ट ॲटलस’ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. क्रमवारी त्याच्या डेटाच्या आधारे संकलित केली जाते आणि वारंवार सुधारित केली जाते. जगातील सर्वोत्तम सँडविचमध्ये वडापावचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
गेल्या वर्षी याच मार्गदर्शकात वडापाव जगभरात १९व्या क्रमांकावर होता. मात्र यंदा त्याचे मानांकन घसरले आहे. जानेवारी २०२५ पर्यंत, वडापावने टेस्ट ॲटलसच्या जगातील सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत ३९ वे स्थान व्यापले आहे. टॉप ५० मधील भारतातील हा एकमेव पदार्थ आहे. सर्वोत्कृष्ट सँडविचच्या सध्याच्या यादीत शॉरमा, बान्ह मी (व्हिएतनाम) आणि टॉम्बिक डोनर (तुर्किये) हे अव्वल स्थानी होते. महत्त्वाच्या १० मध्ये तीन व्हिएतनामी स्वादिष्ट पदार्थ आहेत.
याआधी, भारतीय खाद्यपदार्थांनी वर्षाच्या शेवटी २०२४-२५ च्या टेस्ट ॲटलस अवॉर्ड्समध्ये मोठा विजय मिळवला होता. भारतीय नोंदींनी सर्वोत्तम ब्रेड, सर्वोत्तम भाजीपाला डिशेस, सर्वोत्तम खाद्य प्रदेश, सर्वोत्तम खाद्य शहरे आणि टेस्ट ॲटलसने प्रसिद्ध केलेल्या इतर सूचींमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले.
मऊ पाव त्यामध्ये कुरकुरीत बटाटा पॅटी (वडा) घालून बनवलेली ही एक साधी, पण चवदार अशी डिश आहे. कांदा, मिरची, तिखट आणि सॉसबरोबर त्याची चव आणखीच वाढते. वडापावचं हे वर्णन फक्त वाचूनच तुमच्याही जिभेला पाणी सुटेल. वडापाव हा एक लोकप्रिय आणि परवडणारा नाश्ता आहे, त्यामुळे भारतातील सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेतात. विशेषत: मुंबईतील लोकांचा वडापाव फारच आवडीचा पदार्थ आहे.
वडापावचा इतिहास काय सांगतो?
१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.