एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाची जबाबदारी निभावणारे ६२ वर्षीय नरेंद्र मोदी हे आता भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली आहे. भाजपच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला आजवर अशी हॅटट्रिक करता आलेली नाही. केंद्रात नव्याने सत्ता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनात व प्रचारात मोदी यांना दूर सारून चालणार नाही, हे या निमित्ताने उघड झाले आहे.
प्रथम संघाचे प्रचारक, नंतर गुजरात भाजपचे संघटन सचिव आणि त्यानंतर पक्ष मुख्यालयात अधिकारीपद असा प्रवास केल्यानंतर मोदींच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यांच्या या प्रवासात अनेक टप्पे आहेत. सातत्याने टीकेचे धनी होणारे मोदी हे सध्याच्या काळातील एकमेव नेते असतील. उद्यमशील गुजरातला मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी दिशा गवसली, असे मानले तरी गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया म्हणून मार्च २००२मध्ये उसळलेल्या धार्मिक दंगलीत गेलेले एक हजार मुस्लिमांचे बळी, हा त्यांच्यावरील कलंक आहे, असे मानले जाते. या प्रकरणी त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही अथवा खेद व्यक्त केलेला नाही, अर्थात ‘या दंगलीत मी दोषी आढळलो तर मला फासावर लटकवा’, असे विधान त्यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते, हा अपवाद. यामुळेच मोदी यांच्यावर दोन धर्मीयांत फूट पाडण्याचा आरोप वारंवार होतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांची संभावना ‘मौत का सौदागर’ अशी केली होती. गोध्रा दंगलींना मोदीच कारणीभूत आहेत, असे त्यांना सुचवायचे होते, मात्र काँग्रेससाठी ते बूमरँग ठरले. विकासाच्या मुद्दय़ावर भर देत मोदी यांनी ती निवडणूक जिंकली. यावेळी मात्र त्यांनी आपली मुस्लीमविरोधी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी राज्यभर सद्भावना मेळावे आयोजित केले. दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधही त्यांना सहन करावा लागला. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी ‘गुजरात परिवर्तन पार्टी’च्या माध्यमातून वेगळी चूल मांडली आणि मोदींच्या खुर्चीला हादरविण्याचा प्रयत्न केला, अर्थात तो फोल ठरला.
या विजयानंतर मोदी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘आता मागे वळून पाहायचे नाही, पुढे चालत राहायचे, आपल्याला अगणित ऊर्जेची, धैर्याची आणि संयमाची आवश्यकता आहे!’
मोदी यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपत नसल्याचे मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा