Vadodara Crash Accused Rakshit Chaurasia:  : वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाच्या रक्तात ड्रग्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. नार्कोटिक्स रॅपिड टेस्ट किटमार्फत ही चाचणी करण्यात आली होती.

परंतु, गुजरात पोलिसांकडे ड्रग्जची उपस्थिती तपासण्यासाठी उपलब्ध असलेले रॅपिड टेस्ट किट न्यायालयात ग्राह्य धरता येणार नाही आणि ते केवळ ड्रग्जची उपस्थिती दर्शवते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. वडोदरा पोलिसांनी सांगितले की, चौरसिया हा वेगाने येणाऱ्या फोक्सवॅगन व्हर्टस गाडी चालवत होता आणि त्याने कारलीबाग परिसरात तीन दुचाकींना धडक दिली. यामुळे हेमाली पटेल यांचा मृत्यू झाला आणि १० आणि १२ वर्षांच्या दोन मुलांसह अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्या सात जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की त्यांनी चौरसिया, त्याचा सहप्रवासी प्राणशु चौहान आणि अपघातापूर्वी त्याच्यासोबत असलेल्या तिसऱ्या मित्राचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवले आहेत. गुजरातच्या एका एफएसएल तज्ज्ञाने सांगितले की, “अल्कोहोलच्या वापराचे खटले सिद्ध करणे जितके सोपे आहे तितकेच अंमली पदार्थांच्या सेवनाचे खटले सिद्ध करणे सोपे आहे, तरीही ते क्वचितच न्यायालयात पोहोचतात.”

रक्षित चौरासियाचा पूर्वइतिहास

२३ वर्षीय रक्षित चौरसियाला मागच्या महिन्यातच पोलिसांनी उचलला होता, मात्र केवळी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सयाजीगंज पोलीस ठाण्यात रक्षित आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात एका वकिलाने तक्रार दाखल केली होती.

फतेहगंज परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये रक्षित आणि त्याचे मित्र गोंधळ घालत होते. त्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एका वकिलाने त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र यानंतर संतापलेल्या रक्षित आणि त्याच्या मित्रांनी उलट वकिलावरच दमबाजी केली. वकिलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतले.

रक्षित चौरसिया हा एमएस विद्यापीठातील विधी शाखेचा विद्यार्थी आहे. आता त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे.