Vadodara Car Accident : गुजरात येथील वडोदरा येथे एका २३ वर्षीय व्यक्तीने काही पादचाऱ्यांना तसेच काही वाहनांना उडवल्याचा व्हिडीओ समोर आला होता. गुरूवारी या घटनेत एका महिलेचा मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आता या घटनेतील आरोपीने शुक्रवारी तो दुर्घटनेच्या वेळी दारूच्या नशेत नव्हता असा दावा केला आहे.

आरोप रक्षित चौरसिया याला अटक करण्यात आली असून तो कायद्याचा विद्यार्थी आहे. त्याने दावा केला आहे की, तो ५० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता आणि रस्त्यावर खड्ड्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार सुमारे ५० किलोमीटर प्रति तास वेगाने धावत होती. रस्त्यावर स्कूटी आणि कार होती. मी दारूच्या नशेत नव्हतो. मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटायचे आहे कारण यामध्ये माझी चूक आहे. त्यांची जे हवे असेल ते झाले पाहिजे, असे आरोपीने माध्यमांशी बोलातना सांगितले.

गुरुवारी रात्री वडोदरा शहरातील करेलीबाग परिसरात चौरसिया याने कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होती. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. घटनेच्या वेळी कारचा मालक चौहान नावाचा आणखी एक व्यक्ती देखील त्यांच्याबरोबर होता पण तो गाडी चालवत नव्हता. तर तो बाजूच्या सीटवर बसलेला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या अपघातानंतरच्या व्हिडीओमध्ये अपघातानंतर चौरसिया दारूच्या नशेत गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर चालताना तो ओरडू लागल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘आणखी एक राऊंड, आणखी एक राऊंड’ आणि ‘ओम नमः शिवाय’ असा ओरडत होता.

सहाय्यक पोलिस अधीक्षक लीना पाटील म्हणाल्या, “एक चारचाकी वाहन एका दुचाकी वाहनाला धडकले आणि या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत… हे दारू पिऊन गाडी चालवल्याचा प्रकरण आहे.” पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केल्याने कारच्या मालकालाही नंतर अटक करण्यात आली.