संस्थाने खालसा झाली, असे आपण म्हणत असलो तरी, त्यांचा श्रीमंती थाट, राजेशाही रुबाब अजून कमी झालेला नाही. बडोद्यातील गायकवाड राजघराणे अशाच संस्थानिकांपैकी एक. बडोदा शहरातून फिरताना तेथील भव्य राजवाडे, शाही पॅलेस पाहाताना या श्रीमंत संस्थानाचा राजेशाही रुबाब दिसून येतो. आता हे संस्थान चर्चेत आले आहे, ते या संस्थानाच्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचा वाद संपुष्टात आल्याने. २५ वर्षांपूर्वी गायकवाड राजघराण्याशी संबंधित असलेल्या २८ जणांनी या हजारो कोटींच्या संपत्तीवर हक्क सांगत एकमेकांविरोधात दावे ठोकले. मात्र आता या सर्वानी सामंजस्याची भूमिका घेत संपत्तीची योग्य वाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बडोद्यातील लाल कोर्टाच्या आदेशाने सर्व वादी-प्रतिवादींनी एकत्र बसून संपत्तीची वाटणी केली आणि त्यानंतर न्यायालयीन दावे मागे घेतले.
वाद केव्हा सुरू झाला?
बडोद्याचे प्रसिद्ध महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या काळात बडोदा शहराच्या भरभराटीला वेग आला. सयाजीराव गायकवाड यांचे नातू फत्तेसिंहराव महाराज यांनीही बडोद्याचा राज्यकारभार उत्तमपणे सांभाळला. १९८८मध्ये फत्तेसिंहराव महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू रणजितसिंह गायकवाड यांना राजगादीवर बसवून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. बडोदा राजघराण्याची संपत्ती अफाट होती. त्यामुळे रणजितसिंह यांनी गादीवर येणे त्यांच्या भावंडांना आणि अन्य नातेवाईकांना रुचले नाही. त्यामुळे त्यांनी या संपत्तीवर अधिकार सांगण्यास सुरुवात केली आणि या वादाला सुरुवात झाली. रणजितसिंह गायकवाड यांचे धाकटे बंधू संग्रामसिंह गायकवाड यांनी लाल कोर्टात रणजितसिंह यांच्याविरोधात धाव घेतली. त्यानंतर तात्काळ वेगवेगळय़ा भावांकडून न्यायालयात वाटणीचे दावे करण्यात आले. रणजितसिंह आणि संग्रामसिंह यांच्यातील हा संपत्तीचा वाद मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. मात्र खमक्या स्वभावाच्या रणजितसिंह यांनी सांमजस्याची भूमिका घेण्याची कोणतीही तयारी दाखवली नाही. आपल्या संपत्तीचा कोणताही वाटा संग्रामसिंह वा अन्य भावंडांना देण्यास ते तयार नव्हते. गेल्या वर्षी रणजितसिंह गायकवाडांचे निधन झाल्यानंतर त्यांचे एकुलते एक चिरंजीव समरजितसिंह गायकवाड यांना २२ जून २०१२ रोजी राजगादीवर बसवण्यात आले. आपल्या पित्याप्रमाणे खमके नसलेल्या समरजितसिंह यांनी राजसत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
अनेक बैठका घेऊन सर्व भावंडांनी मालमत्तेच्या वाटपाचा अंतिम मसुदा तयार केला आणि तो लाल कोर्टात सादर केला. राजघराण्यातील २८ जणांनी वाटपाच्या करारपत्रावर स्वाक्षरी केली आणि २२ वर्षांपासून सुरू असलेला शाही वाद संपुष्टात आला.
गायकवाड राजघराण्याचा इतिहास
गायकवाड संस्थानाची स्थापना १७२१मध्ये मुघल साम्राज्याच्या काळात पिलाजीराव गायकवाड यांनी केली. मात्र बडोदा शहर भरभराटीस आले, ते पिलाजीराव यांचे चिरंजीव दामाजीराव यांच्या काळात. पेशव्यांचे सरदार असलेल्या दामाजीराव यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभाग घेतला होता. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर इंदूर, ग्वाल्हेर यांसारखेच बडोदाही स्वतंत्र संस्थानिक झाले. १८७५मध्ये या राजघराण्याची सूत्रे सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या हातात आल्यानंतर या राजघराण्याचा शाही रुबाब पाहण्यास मिळाला. सयाजीरावांनी अनेक भव्य महाल, शाही इमारती बांधल्या. आधुनिकता आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते असलेल्या सयाजीरावांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभ्या केल्या. बडोद्याचा कापड उद्योग त्यांच्याच काळात भरभराटीला आला. सर्वसामान्यांसाठी विविध कायदे निर्माण करणाऱ्या सयाजीरावांनी न्यायनिवाडय़ासाठी ‘लाल कोर्टा’ची निर्मिती केली. त्याच लाल कोर्टात राजघराण्याच्या संपत्तीचा वाद चालला, हे विशेष.
सयाजीरावांनंतर त्यांचे नातू प्रतापसिंह गायकवाड १९३९मध्ये राजसत्तेवर आले. त्यांनी राजघराण्याचा पैसा पाण्यासारखा खर्च करण्यास सुरुवात केली. अनेकदा परदेश दौरे करून त्यांनी संपत्तीचे अक्षरश: आर्थिक निस्सारणच सुरू केले. त्यामुळे १९५१मध्ये त्यांचे चिरंजीव फत्तेसिंहराव महाराज राजगादीवर आले. राजकारण व क्रिकेटचे  चाहते असलेले फत्तेसिंह हे बडोद्याचे खासदारही होते. १९४६ ते १९५८ पर्यंत बडोद्याकडून रणजी क्रिकेट खेळलेल्या फत्तेसिंहराव यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. १९८८ला त्यांचे निधन झाल्यानंतर राजघराण्याच्या संपत्तीचा वाद सुरू झाला.
कुणाला काय मिळाले?
समरजितसिंह गायकवाड
गायकवाड घराण्यातील २८ जणांना संपत्तीचा वाटा मिळाला असला, तरी राजघराण्याची खरी सूत्रे ज्यांच्या हातात होती, त्या समरजितसिंह गायकवाड यांनाच सर्वाधिक संपत्ती मिळाली आहे. बडोद्यातील प्रसिद्ध ‘लक्ष्मीविलास पॅलेस’वर समरजितसिंह यांचा हक्क राहणार आहे. भारतातील अनेक राजमहालांपैकी एक असलेल्या या भव्य महालाचा रुबाब काही औरच आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी १८९०मध्ये बांधलेला हा राजमहाल लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपटीने मोठा आहे. ६०० एकरात वसलेल्या या महालाच्या आवारात गोल्फचे मैदानही आहे. या सर्व संपत्तीचे मालक असतील समरजितसिंह गायकवाड. त्याशिवाय रेसकोर्स भवन, राजा रविवर्मा स्टुडिओ, फत्तेसिंह गायकवाड संग्रहालय, राजमहल ग्राउंड यांची मालकीही त्यांच्याकडेच आली आहे. संस्थानच्या खजिन्यातील सोन्याचे दागिने, हिरे, चित्रे आणि इतर अमूल्य वस्तूही समरजितसिंह यांना मिळाल्या आहेत.
संग्रामसिंह गायकवाड
नजरबाग पॅलेस, इंदुमती पॅलेस, अशोक बंगला, राजमहल रोडवरील बकुळ बंगला. त्याशिवाय मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील फ्लावर मिड आणि मरीन ड्राइव्ह येथील सेंटय़ू मरीन या इमारतीचा काही हिस्सा आणि राजघराण्याच्या मालकीची अलौकिक ट्रेडिंग कंपनी.
संग्रामसिंह यांच्या पाच बहिणींना बडोदा, मुंबई, दिल्लीतील राजघराण्याच्या मालकीच्या इमारती, जमिनी आणि मालमत्तेचा हिस्सा मिळणार आहे.
याखेरीज, राजघराण्याच्या १६ ट्रस्टचा वाटा इतर वाटेकऱ्यांना मिळणार आहे. या ट्रस्टकडे अनेक मंदिरांचे अधिकार असून, सोने-चांदीचे दागिने, अनमोल चित्रे त्यांच्या मालकीची आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vadodaras gaekwad royal family settles rs 20000 cr property dispute
Show comments