भारतीय राजकारणात महत्वपूर्ण योगदाने देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पन्नासच्या दशकापासून भारतीय राजकारणात सक्रीय असलेल्या वाजपेयींचे व्यक्तिमत्वच असे होते कि, शत्रूला जिंकून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळया आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांचा पाकिस्तान दौरा प्रचंड गाजला होता.
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता. दोन्ही देशांमध्ये बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर वाजपेयी स्वत:हा १९ फेब्रुवारी १९९९ रोजी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. त्यावेळी पलीकडे पाकिस्ताचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ त्यांच्या स्वागतला उभे होते. दोन्ही देशातल्या लोकांचा परस्परांशी संर्पक वाढावा, मैत्री, बंधुत्वाची भावना वाढीस लागावी यासाठी वाजपेयींनी बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेले त्यावेळी सुधींद्र कुलकर्णी त्यांच्यासोबत होते. वाजपेयींनी पाकिस्तानात पाऊल ठेवल्यानंतर तिथे असणारे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुशाहीद हुसैन खासगीमध्ये सुधींद्र कुलकर्णींना वाजपेयी पाकिस्तानात आले ते खरोखर बिनधास्त, हिम्मतवान नेते आहेत असे म्हटले होते. दोन्ही नेत्यांनी यावेळी काश्मीरसह विविध द्विपक्षीय मुद्यावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा संकल्प केला होता.
आपल्या या दौऱ्यात अटलजींनी आपल्या व्यक्तिमत्वाने पाकिस्तानी जनतेची मने जिंकून घेतली होती. आपल्या दौऱ्यात वाजपेयींनी मिनार-इ-पाकिस्तानला भेट दिली. पाकिस्तानचा जन्म झाला तेव्हा १९४७ साली मिनार-इ-पाकिस्तान स्मारक उभारण्यात आले होते. त्यानंतर लाहोर किल्ल्यावर वाजपेयींना पाकिस्तान सरकारकडून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी वाजपेयींनी आपल्या भाषणाने पाकिस्तानी जनतेची मने जिंकून घेतली होती. वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाने पाकिस्तानी नागरिक इतके प्रभावित झाले होते कि, वाजपेयी आता पाकिस्तानातही सहज निवडणूक जिंकतील असे नवाझ शरीफ म्हणाले होते.