पाक दौऱ्याबाबत अडवाणींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘उत्स्फूर्त’ पाकिस्तान भेट म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याच पावलावर पाऊल असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवित, पंतप्रधानांसह सरकारमधील सर्वच नेत्यांनी वाजपेयी यांच्या प्रयत्नांना वेग द्यावा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी केले. बिहार निवडणुकीतील पराभवाचे निमित्त साधत अडवाणी यांनी मोदी यांच्याविरोधातील नाराजीला एकप्रकारे तोंड फोडले होते. त्यानंतर कीर्ती आझाद यांच्या निलंबनानंतरही मार्गदर्शक मंडळासह अन्य ज्येष्ठ नेत्यांबरोबर खलबते करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता.
कच्छमधील गांधीधाम येथे सिंधी समाजाच्या कार्यक्रमानिमित्त अडवाणी शनिवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मोदी यांच्या पाकिस्तान भेटीबाबत विचारता त्यांनी मोदी यांच्या या भेटीचे स्वागत करतानाच उभय देशांतील मैत्रीचा पाया वाजपेयी यांनीच २००४मध्ये रचल्याची आठवण त्यांनी करून दिली. कीर्ती आझाद यांच्या निलंबनाबाबत मात्र कोणतीही वाच्यता करणे त्यांनी टाळले.
वाजपेयी हे १९९९ मध्ये भारतातून लाहोरला बसने गेले होते. त्यानंतर २००४पासून त्यांनी पाकिस्तानबरोबर शांततेसाठीच्या चर्चेकरिता पुढाकार घेतला होता. २००५मध्ये अडवाणी यांनीही पाकिस्तान दौरा केला, मात्र त्या दौऱ्यात जिना यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतल्यावरून व जिना यांची स्तुती केल्यावरून वादंग उफाळले होते. मोदी यांच्या अवचित पाक भेटीचे स्वागत करतानाच अडवाणी म्हणाले की, उभय देशांतील संबंध सुरळीत होत नाहीत तोवर दहशतवादाच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा निघणे शक्य नाही.
जागतिक स्तरावर स्वागत
संयुक्त राष्ट्रांनीदेखील मोदी यांच्या अनपेक्षित लाहोर भेटीचे कौतुक करत ही भेट उभय देशांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. या भेटीचा उपखंडातील नागरिकांना फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या वतीने देण्यात आली.
चौकट
हाफिज सईदची गरळ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याने मात्र या भेटीमुळे राष्ट्रवादी पाकिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्याची गरळ ओकली आहे. मोदी यांच्या मैत्रीखातर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरचे बलिदान देऊ नये, असा इशारा त्याने दिला आहे. ज्या अफगाणींना मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध चिथावले, बांगला देश निर्मितीचे समर्थन केले त्यांचेच शाही स्वागत शरीफ यांनी केल्याबद्दल त्याने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.