कर्नाटकात येडियुरप्पा सरकार कोसळताच देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी अनेकांनी बहुमत नसतानाही येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देणारे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावरही जोरदार टीका केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी वजुभाई वाला यांच्या निर्णयावर टीका करताना अत्यंत वादग्रस्त विधान केले.

या देशात वजुभाई वाला यांनी निष्ठावान, प्रामाणिकपणाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापुढे भारतातला प्रत्येक व्यक्ति आपल्या कुत्र्याच नाव वजुभाई वालाच ठेवेल कारण त्यापेक्षा कोणी प्रामाणिक असूच शकत नाही असे निरुपम म्हणाले. तुम्ही संविधानिक पदावर असताना कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. जर तुमच्याकडून कायद्याचे पालन होत नसेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे असे निरुपम म्हणाले.

सोमवारी कर्नाटकात अस्तित्वात येणार नवीन सरकार
कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. स्वत: कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. राज्यपालांनी मला शपथविधीसाठी निमंत्रित केले असून सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान शपथविधीचा कार्यक्रम होईल असे कुमारस्वामी यांनी सांगितले. बीएस येडियुरप्पा औट घटकेचे मुख्यमंत्री ठरल्यानंतर आता कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

काय म्हणाले जावडेकर
काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा पराभव केला हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विधान हास्यास्पद आहे. जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी झालेली आघाडी हे एकप्रकारचे आत्मसमर्पण आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी होऊ नये यासाठी काँग्रेसने जेडीएसशी हातमिळवणी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे भाजपा प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी
नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात पण तेच एकप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. स्वत: नरेंद्र मोदी एक भ्रष्टाचार आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकात येडियुरप्पा सरकार कोसळल्यानंतर ते पत्रकारपरिषदेला संबोधित करत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या सत्राचे राष्ट्रगीताने समापन होणार होते पण त्याआधीच भाजपा आमदार आणि हंगामी सभापती सभागृहाबाहेर पडले. सत्तेत असल्यानंतर आम्ही कुठल्याही संस्थेचा अनादर करु शकतो हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले. सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य घटनात्मक संस्थांचा भाजपा आदर करत नाही असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader