टाटा समूहाचे माजी चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे चर्चेत आहेत. एका वेबसाइटशी बोलतानाी रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यातील हळव्या क्षणांचा उलगडा सगळ्यांसमोर केला. त्यांचा जीव कसा एका मुलीवर जडला होता… त्यांचं हे प्रेम कसं लग्नापर्यंत पोहोचलं होतं…याचा खुलासाही त्यांनी केला आहे. या आशयाची पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर केली आहे.

रतन टाटा या पोस्टमध्ये म्हणतात.. ”माझं बालपण मजेत गेलं. पण, मी आणि माझा भाऊ मोठं होत होतो तेव्हा आमच्या आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्या काळात घटस्फोट ही काही आजच्या सारखी सामान्य गोष्ट नव्हती. माझ्या आजीनं आमचा योग्यरित्या सांभाळ केला. माझ्या आईनं दुसरं लग्न केल्यानंतर शाळेत आमच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. आमची छेड काढत होते. चिडवत होते. परंतु, आमच्या आजीनं आम्हाला नेहमी शांत राहायला शिकवलं. आपली प्रतिष्ठा राखायला शिकवलं.”

रतन टाटा यांनी आपल्या वडिलांशी झालेल्या मतभेदांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, ”आता हे सांगणं सोपंय की कोण चूक होतं आणि कोण बरोबर. मला व्हायोलिन शिकायचं होतं. परंतु माझ्या वडिलांना वाटायचं की मी पियानो शिकावं. मला शिकण्यासाठी अमेरिकेत जायचं होतं. पण वडिलांना वाटायचं की मी ब्रिटनमध्ये राहावं. मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. पण, वडिलांची ही जिद्द होती की मी इंजिनीअर का नाही होत.”

त्यानंतर रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठात गेले. त्याचं पूर्ण श्रेय ते आपल्या आजीला देतात. ते म्हणतात की, ”मी मेकॅनिकल इंजीनिअर करत होतो. मात्र नंतर मी आर्किटेक्चरची डिग्री घेतली.”

https://www.instagram.com/p/B8d24CCBdDO/?

असं झालं प्रेम, पण…
रतन टाटा त्यानंतर लॉस एंजेल्समध्ये नोकरीसाठी गेले. तेथे त्यांनी दोन वर्ष कामही केलं. त्या दिवसांच्या आठवणी सांगताना रतन टाटा म्हणतात, ”तो काळ सुखावह होता. वातावरणही मस्त होते. माझ्याकडे गाडी होती. मला माझी नोकरीही आवडत होती.” त्यानंतर याच शहरात त्यांना त्यांच्या आवडीची मुलगी भेटली. रतन टाटा यांचं तिच्यावर प्रेमही जडलं. या हळव्या क्षणांबद्दल रतन टाटा यांनी सांगितले की, ”लॉस एंजेल्स शहरात मला प्रेम झालं. मी त्या मुलीशी लग्नही करणार होतो. परंतु, माझ्या आजीची प्रकृती बरी नसल्यानं त्याच काळात मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं होतं की जिच्यावर मी प्रेम करत होतो आणि जिच्याशी मी लग्नही करण्याच्या तयारीत होतो ती मुलगीही माझ्यासोबत भारतात येईल. मात्र, १९६२ साली भारत-चीनचे युद्ध झाले आणि त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला. आणि हे नातं तिथंच संपलं.”

Story img Loader