गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली आहे. उदवाडा आणि वापी रेल्वेस्थानकदारम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात वंदे भारत एक्स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघाताची ही चौथी वेळ आहे. गुरुवारी (१ डिसेंबर) संध्याकाळी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी या घटनेबाबात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उदवाडा-वापी या रेल्वेस्थानकांदरम्यान गेट क्रमांक ८७ जवळ हा अपघात घडला.
अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले. संध्याकाळी ६.२३ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर काही कालावधीसाठी रेल्वे थांबवण्यात आली होती.
याआधी वटवा ते मनीनगरदरम्यान अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अपघात घडला होता. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात घडला होता.