Vande Bharat Express Towed by other Train Engine : रेल्वे मंत्रालय अलीकडच्या काळात वंदे भारत एक्सप्रेसवर अधिक लक्ष देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या तुलनेत इतर मेल, एक्सप्रेसकडे रेल्वे मंत्रालयाचं फारसं लक्ष नसल्याची टीका सातत्याने होते. असं असूनही देशाच्या वेगवेगळ्या भागातून वंदे भारत एक्सप्रेस खराब झाल्याच्या, नादुरुस्त झाल्याच्या, अपघाताच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. आता वंदे भारत एक्सप्रेस बिघडल्याची आणखी एक बातमी समोर आली आहे. नवी दिल्लीवरून वाराणसीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी सकाळी इटावाजवळ बिघडली. ही ट्रेन मध्येच थांबल्यामुळे त्या ट्रेनमधील प्रवासी बचैन झाले होते, तसेच त्या रेल्वे मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. वंदे भारत एक्सप्रेसचं इंजिन दुरुस्त करण्याचे वेगवेगळे प्रयत्न करूनही इंजिन सुरू झालं नाही. अखेर ही ट्रने मालगाडीचं इंजिन लावून खेचून नेण्यात आली. मालगाडीचं इंजिन लावून ही बिघडलेली वंदे भारत एक्सप्रेस भरथना रेल्वे स्टेशनवर नेण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही वंदे भारत ट्रेन भरथना रेल्वे स्टेशनवर नेल्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना शताब्दी एक्सप्रेस व अयोध्येला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसवलं. तर बनारसला जाणाऱ्या प्रवाशांना श्रम-शक्ती एक्सप्रेसमध्ये बसवून बनारसला पोहोचवलं.

हे ही वाचा >> GST Council Meeting : कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार, फरसाणावरील जीएसटीत घट; केंद्र सरकारचे मोठे निर्णय

रेल्वे मंडळाकडून ७३० प्रवाशांसाठी वेगळ्या गाड्यांची व्यवस्था

प्रयागराज रेल्वे मंडळाचे अधिकारी अमित कुमार सिंह म्हणाले, वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ७३० प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना शताब्दी आणि अयोध्या वंदे भारत एक्सप्रेसमधून कानपूरला पोहोचवण्यात आलं. तर काहींना श्रम शक्ती एक्सप्रेसमधून बनारसला नेण्यात आलं.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की नवी दिल्लीहून बनारसला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस इटावा स्टेशन ओलांडून भरथना रेल्वेस्टेशनच्या पुढे पोहोचली होती. मात्र सकाळी ९.१५ वाजता या ट्रेनचं इंजिन बिघडलं. त्यामुळे ट्रेन मध्येच थांबली होती.

हे ही वाचा >> Kolkata Rape-Murder : “ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत, आम्हाला पैसे…”, कोलकाता पीडितेच्या आईचा अत्यंत गंभीर आरोप

ट्रेन अजूनही भरथना स्थानकावरच उभी

रेल्वेचे अभियंते तातडीने घटनस्थळी रवाना झाले. त्यांनी इंजिन दुरुस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेर रेल्वेने मालगाडीचं इंजिन जोडून ट्रेन ओढली. ही ट्रेन भरथना रेल्वे स्थानकावर नेण्यात आली. प्रवाशांसाठी इतर गाड्यांची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानी पाठवण्यात आलं आहे. मात्र बंद पडलेली वंदे भारत एक्सप्रेस अजूनही भरथना स्थानकावरच उभी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express delhi varanasi technical glitch towed by freight train engine asc