Varanasi Gang Rape सामूहिक बलात्काराच्या घटनेने वाराणसी हादरलं आहे. एका १९ वर्षांच्या मुलीवर २९ मार्च ते ४ एप्रिल असे सहा दिवस बलात्कार करण्यात आला. त्याआधी तिला मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ देण्यात आले होते. ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवल्यानंतर तिला शोधण्यात आलं. ती सापडली, मात्र तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये नेऊन आणि ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला ही धक्कादायक बाबही उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत १० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या घटनेने देश हादरला आहे.
वाराणसीतली नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेवर २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत २३ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या पीडितेच्या कुटुंबाने या संदर्भातली तक्रार ६ एप्रिल रोजी दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात कलम ७० (१) (सामूहिक बलात्कार), कलम ७४ (महिलेचं चारित्र्यहनन करणे, मारहाण करणे), कलम १२३ (विष देऊन, औषधी द्रव्यं देऊन मारण्याचा प्रयत्न करणे) अशा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसंच या २३ जणांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. राज विश्वकर्मा, समीर, आयुष, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद, झाहीर, इम्रान, जैब, अमन आणि राज खान अशी ओळख पटलेल्या गुन्हेगारांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डीजीपी प्रशांत कुमार यांनी काय सांगितलं?
वाराणसी बलात्कार प्रकरणात आम्ही पीडितेच्या जबाबानंतर १० हून अधिक जणांना अटक केली आहे अशी माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वाराणसी येथील बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान वाराणसी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी सीपीआय एम च्या महिलांनी मोर्चा काढला. १९ वर्षीय मुलीला मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ कोल्ड ड्रिंकमधून देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर २३ जणांनी बलात्कार केला. ही घटना ७ एप्रिलला समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर कारवाई सुरु केली. तसंच या प्रकरणात पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
६ एप्रिलला नोंदवण्यात आली तक्रार, आत्तापर्यंत १० हून अधिक अटकेत
अतिरिक्त पोलीस आयुक्त विदुष सक्सेना यांनी माध्यमांना माहिती दिली, ते म्हणाले, “१९ वर्षीय पीडिता २९ मार्च रोजी काही तरुणांसह बाहेर गेली होती. ती परत आली नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार नोंदवली. ४ एप्रिलच्या दिवशी मुलीच्या पालकांनी ही तक्रार नोंदवली. पोलिसांनी या मुलीला सोडवलं. मात्र तिने सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती त्यावेळी दिली नाही. तिच्या कुटुंबाने ६ एप्रिल रोजी तिच्यावर २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात केली.” या प्रकरणात आता १० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.