वाराणसीतील प्रसिद्ध ‘बाबा काल भैरव’ मूर्तीला आज पोलिसांचा गणवेश परिधान करण्यात आला. देवतेच्या डोक्यावर पोलीस टोपी, छातीवर बिल्ला, डाव्या हातात दंडुका आणि उजव्या हातात रजिस्टर ठेवण्यात आले आहे. ‘काशीचा कोतवाल’ म्हणून ओळखल्या जाणार्या या देवाचा नवा लूक आता व्हायरल होत आहे ज्यामुळे अनेक भक्त मंदिरात गर्दी करत आहेत.
“करोना संसर्गापासून देशातील जनतेचे रक्षण व्हावे, यासाठी विशेष पूजा करण्यात आली आहे. सर्वांवर कृपा करावी, अशी विनंती बाबांना करण्यात आली आहे. राज्यात आणि देशात सुख-समृद्धी नांदो. लोक निरोगी राहोत आणि कोणालाही त्रास होऊ नये,” असं बाबा काळभैरव मंदिराचे महंत अनिल दुबे म्हणाले.
काळभैरव आपल्या पोलीस अवतारात जे कोणी एखादी चूक करतात त्यांना शिक्षा करतील अशी भक्तांची श्रद्धा आहे.”बाबा काल भैरव हे काशीचे कोतवाल आहेत आणि आता त्यांनी गणवेश देखील घातला आहे, ते चुकीच्या लोकांशी कठोरपणे वागतील,” असे एका भक्ताने सांगितले.”जर बाबा रजिस्टर आणि पेन घेऊन बसले असतील, तर कोणाचीही तक्रार दुर्लक्षित राहणार नाही,” दुसरा म्हणाला.