Varanasi Love Tringle: उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. एका तरूणीने नव्या प्रियकराबरोबर फिरण्यासाठी जुन्या प्रियकराचा मोठ्या शिताफीने खून केला. होळीच्या दिवशी जुन्या प्रियकराला फोन करून बोलावून घेतल्यानंतर नव्या प्रियकराकडून त्याच्यावर गोळीबार केला. आसनगंज येथे १४ मार्च रोजी सदर गुन्हा घडला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी प्रेयसी सरस्वती आणि तिचा नवा प्रियकर राजकुमारला अटक केली.
प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव दिलजीत असे आहे. लग्न आणि इतर समारंभात सजावट करण्याचे काम दिलजीत करत असे. होळीच्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सरस्वतीने दिलजीतला बोलावून घेतले होते. त्याचवेळी एक दुचाकी समोर येते. हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार दिलजीतच्या छातीत गोळी झाडतो. गोळी लागल्यानंतर दिलजीतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याला मृत घोषित गेले. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्ही चित्रणात दिसल्याप्रमाणे, गोळी झाडणारा आरोपी टीव्हीएस स्प्लेन्डरवरून येत असल्याचे दिसत आहे. तसेच मृत दिलजीत त्याच्या स्कुटीवर येतो. तेव्हाच आरोपी राजकुमार त्याच्यावर गोळी झाडून निघून जातो. पळून जातानाचाही एक व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे.
पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रेयसी सरस्वतीच्या सांगण्यावरून सदर खून केल्याचे कबूल केले. सरस्वती आणि दिलजीत यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतर राजकुमार तिला आवडू लागला. दरम्यान दिलजीतचेही लग्न दुसऱ्या मुलीशी ठरले होते. तरीही तो सरस्वती आणि राजकुमार यांचे संबंध त्याला रुचत नव्हते. राजकुमार पासून दूर रहा, अशी ताकीद तो वारंवार सरस्वतीला देत असे.
दिलजीतने सरस्वतीवर दबाव आणल्यामुळे तिघांमध्येही वाद होत होते. यामुळे सरस्वतीने दिलजीतला बाजूला करण्याचा कट रचला. त्याप्रमाणे दिलजीतला होळीच्या दिवशी फोन करून बोलावून घेतले आणि राजकुमारकरवी गोळीबार केला. गोळीबार झाला त्यावेळी सरस्वतीही घटनास्थळी उपस्थित होती.
पोलिसांनी आरोपी राजकुमारकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि पिस्तुल ताब्यात घेतली आहे. त्याने बिहारमधून २५ हजारात सदर पिस्तुल विकत घेतल्याचे मान्य केले.