उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे एका भयंकर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. १२ वीत शिकणाऱ्या १९ वर्षीय एका विद्यार्थिनीचं अपहरण करत तिच्यावर सतत सात दिवस अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत या विद्यार्थिनीवर २३ जणांनी अत्याचार केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, आरोपींपैकी अनेक जण हे पीडितेच्या ओळखीचे होते. यामध्ये काही तिच्या ओळखीचे चेहरे होते, तर काही माजी वर्गमित्र आणि इन्स्टाग्रामवरील संवादातून ओळख झालेल्या काही जणांचा सहभाग होता. पोलिसांनी सर्व २३ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे, तसंच ११ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही; तर उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
समोर आला घटनाक्रम…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्चला बारावीत शिकणारी ही पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसह वाराणसीतील हुक्का बारमध्ये गेली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली. ४ एप्रिल रोजी ती घरी परतली तेव्हा तिने तिच्या कुटुंबीयांना अत्याचाराविषयी सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ती एका मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि त्यानंतर ती परतली नव्हती.
या पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, २९ मार्चला तिची एक मैत्रीण तिला पिशाचमोचन भागातील एका हुक्का बारमध्ये घेऊन गेली. त्या तिथे पोहोचल्यानंतर इतर काही जणही त्यांच्यासोबत आले. त्यानंतर काही जणांनी तिला शीतपेय प्यायला दिले आणि सिगरा परिसरातील काही हॉटेल्समध्ये तिला घेऊन गेले. इथे वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेल्समध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.
२९ मार्चला सामूहिक अत्याचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० मार्चला रस्त्याने चालत असताना तिला पुन्हा त्यातीलच एक आरोपी आणि तिचा मित्र असणारा दुसरा आरोपी भेटला. त्यांनी तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून महामार्गाजवळ अज्ञातस्थळी नेले आणि तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. अत्याचारानंतर तिला आरोपींनी नादेसरमध्ये सोडून दिले.
अमली पदार्थाच्या नशेत असल्यामुळे ही तरूणी दोन दिवसांनंतरही घरी पोहोचू शकली नाही. तिसऱ्या दिवशी ३१ मार्चला आणखी पाच पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला. या पाच जणांनी तिला मालदहिया इथल्या हॉटेलमध्ये नेऊन तिला अमली पदार्थ देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर १ एप्रिलला दुसरा एक आरोपी त्याच्या मित्रासह तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे आणखी तीन जण आधीपासून उपस्थित होते. तिथेही तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला गेला. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर आणखी एकाने तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची ही साखळी इथेच संपली नाही तर एका आरोपीने तिला औरंगाबादमधील एका वेअरहाऊसमध्ये नेत तिच्यावर इतर दोन जणांच्या साथीने सामूहिक अत्याचार केला.
एका क्षणी तिला पळून जाण्यात यश मिळाले आणि सिगरा इथल्या एका मॉलबाहेर ती येऊन बसली. मात्र, तिथेही हा प्रकार काही थांबला नाही. तिथे दोन जणांनी तिला अमली पदार्थ मिसळलेले नूडल्स खायला देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिला अस्सी घाटावर सोडून दिले. दरमजल करत ती ३ एप्रिलला एका मैत्रिणीच्या घरी पोहोचली, मात्र तरीही अमली पदार्थाची गुंगी असल्याने तिची शुद्ध हरपली. त्याच संध्याकाळी ती पुन्हा काही मित्रांच्या संपर्कात आली. त्यांनीही तिला हॉटेलमध्ये नेऊन तिला अमली पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केले आणि चौकघाटावर तिला सोडून दिले. ४ एप्रिलला आणखी एका मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यावर सुदैवाने तिने पीडितेला घरी सोडले.
पीडित मुलगी घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांसह लालपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. पीडित मुलगी गेलेल्या हुक्का बारमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली. तपासासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. तपासाला सुरुवात केल्यानंतर लगेचच सहा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी काही जण हुकुलगंज आणि लल्लापुरा भागातील रहिवासी आहेत आणि त्यांना त्याच रात्री ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, काही संशयित हे अल्पवयीनदेखील असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. अटक झालेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. याप्रकरणी अतिरिक्त कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तसंच उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकंही तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या सर्व घटनाक्रमात पीडित मुलीने पोलिसांशी किंवा कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नाही, नेमकी परिस्थिती काय होती याबाबतही पोलीस तपास करत आहेत.