अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना आताच्या भारत दौऱ्यात येथील विणकरांनी तीन महिने परिश्रम करून हाताने विणलेली बनारसी रेशमी साडी नजराणा म्हणून दिली जाणार आहे, या साडीला ‘कधुआ साडी’ असे म्हटले जाते. हाताने विणलेल्या साडीत सोन्याचे व चांदीचे धागे विणलेले असतात. साडीचे वजन ४०० ग्रॅम असून किंमत दीड लाख रुपये आहे.
अब्दुल मटिन यांचे कुटुंब तीन पिढय़ा साडय़ा विणण्याचा व्यवसाय करते आहे. मिशेल यांचे बनारसी साडीचे आकर्षण आम्हाला माहीत आहे, असे सांगून मटिन म्हणाले की, भारतीय वंशाचे अमेरिकी फ्रँक इस्लाम या ओबामा यांच्या विश्वासू व्यक्तीने या साडीची मागणी नोंदवली होती. इस्लाम हे आझमगड येथे जन्मलेले असून त्यांना मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर हा पुरस्कार मिळाला होता. ते भारतात आलेल्या अमेरिकी शिष्टमंडळात आहेत. कधुआ रेशमी साडी ही फार दुर्मीळ असते व हाताने विणण्यास तीन-चार महिने लागतात.

Story img Loader