नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांनी होळीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केल्याने सोमवारी विविध राजकीय पक्षांचे रंग होळीच्या रंगांमध्ये मिसळले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर होळी साजरी केली. गांधीनगरमधील भाजपच्या कार्यालयात शहा आणि पटेल यांनी पक्षनेत्यांना रंग लावले.  ५०० वर्षांच्या खंडानंतर प्रभू श्रीराम यंदा अयोध्येत होळी साजरी करीत असल्याने सर्व रामभक्तांसाठी यंदाची होळी विशेष आहे, असे अमित शहा या वेळी म्हणाले. शहा यांना यंदा गांधीनगरमधून लोकसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये ते येथून ५ लाखांहून अधिक मतांनी जिंकले होते.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : ‘वायनाडमध्ये अमेठीच्या निकालाची पुनरावृत्ती ’

कोलकात्यात तृणमूल काँग्रेस, भाजप, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य पक्षांनी विविधरंगी गुलालांची उधळण करत ‘डोल यात्रा’ साजरी केली. कोणताही राजकीय ध्वज किंवा घोषणा नसताना रस्त्यावर उतरलेल्या बहुतेक नेत्यांनी असा दावा केला की या दिवशी रंगांचा सण साजरा करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत ते लोकांशी एक सहनागरिक म्हणून जोडले गेले.

पंजाब आणि हरियाणावासीयांनी चंडीगडमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगांचे फुगे एकमेकांवर फेकत, गुलाल लावत होळी आणि धुळवड साजरी झाली. अमृतसरच्या दुर्गियाना मंदिरात लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पंजाबचे राज्यपाल आणि चंडिगडचे प्रशासक बनवारी लाल पुरोहित आणि हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी नागरिकांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. राजस्थानमध्ये जयपूरच्या प्रसिद्ध गोविंद देवजी मंदिरात होळीचा उत्साह होता.  मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात त्यांच्याबरोबर होळीचा आनंद लुटला.

Story img Loader